राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात १ रुपयांचा अब्रुहानीचा दावा त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्‍याकडून प्रविष्ट !

काय आहे प्रकरण ?

शिवा मोहोड आणि माजी नगरसेवक विशाल गावंडे यांनी मूर्तिजापूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर २८ ऑगस्ट या दिवशी मिटकरी यांच्यावर ‘कमिशन’खोरीचे आरोप केले होते, तसेच मिटकरी यांच्या महिलांच्या अनुषंगाने काही गंभीर आरोप केले होते. यानंतर आमदार मिटकरी यांनी मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

शिवा मोहोड आणि अमोल मिटकरी

अकोला – शिवा मोहोड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात १ रुपयांचा अब्रुहानीचा दावा प्रविष्ट केला आहे. ‘अमोल मिटकरी यांची कुवत तेवढीच असून अधिक रकमेची नोटीस दिली असती, तर मिटकरी यांना काळी कामे करावी लागली असती’, अशी प्रतिक्रिया मोहोड यांनी दिली.

आमदार अमोल मिटकरी यांनी यापूर्वी मोहोड यांच्या विरोधात ५ कोटी रुपयांचा अब्रुहानीचा दावा न्यायालयात प्रविष्ट केला आहे. ‘त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने जनमानसात त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे’, असा आरोप करून मोहोड यांना नोटीस बजावली. मोहोड यांच्यासह १ वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विशाल गावंडे यांच्यावरही आमदार मिटकरी यांनी दावा ठोकला आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे अंतर्गत वादातून एकमेकांचे कट्टर विरोधक कार्यकर्ते असणारे पक्ष जनहित कधीतरी साधू शकतील काय ?