श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

१० सप्टेंबर २०२२ या दिवशी (आजपासून) पितृपक्षास आरंभ होत आहे. त्या निमित्ताने…

पितृपक्ष विशेष

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म, हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते. काही लोकांना ती टीका खरी वाटते, तर अनेकांना ‘ती टीका विखारी आहे’, हे लक्षात येऊनही टीकेचे खंडण करता शक्य होत नाही. काही विद्वानांकडूनही अज्ञानापोटी अयोग्य विचार मांडले जातात.

टीकेचा प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते. ही धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना वैचारिक दिशा मिळणे आवश्यक आहे. त्यातच श्राद्धविधी म्हटले की, अनेक धर्मविरोधकांना चेव चढतो. आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. (म्हणे) ‘श्राद्धविधी हे ब्राह्मणांचे उदर-भरणासाठीचे कारस्थान आहे !’

टीका : श्राद्ध हे ब्राह्मणांचे कारस्थान आहे. यामुळे ब्राह्मणांनी आपली उदर-भरणाची सोय केली आहे.

खंडण

अ. श्राद्धविधी हा लक्षावधी वर्षांपासून चालत असलेला विधी असणे : लक्षावधी वर्षांपासून आजपावेतो समस्त हिंदुस्थानातील गावोगावी, घरोघरी, प्रत्येक ठिकाणी श्राद्ध होते. तोच श्राद्धविधी अनुसरला जातो. ‘तुम्ही सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही’ (You can’t fool all the people all the time !), असे एक वचन प्रसिद्ध आहे. त्यानुसारच जर श्राद्धविधी हे ब्राह्मणांचे कारस्थान असते, तर ते समाजाला इतकी वर्षे फसवू शकले असते का ? आजही गया, त्र्यंबकेश्वर, रामटेक, प्रयाग इत्यादी पवित्र ठिकाणी श्राद्धकर्म होते.

आ. कलियुगामुळे अन्यत्र धनाचा नाहक व्यय करणार्‍यांना स्वत:च्या पितरांसाठी ब्राह्मणाला भोजन देणे अप्रस्तूत वाटणे : हे कलियुग असल्याने प्रायः लोक फार स्वार्थी आहेत. स्वतः मित्र-परिवारांसाठी मोठमोठे मद्यपानाचे समारंभ साजरे करतात आणि त्यासाठी रात्रंदिवस निरर्थक धन वेचतात. त्यातच ते आनंद मानतात; परंतु ज्या माता-पित्यांची आयुष्यभर सेवा करूनही त्यांचे ऋण फेडले जात नाही, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी शास्त्रविधीनुसार त्यांच्या प्रीत्यर्थ एका ब्राह्मणाला (पितराच्या प्रतिनिधीला) भोजन घालायलाही सिद्ध होऊ नये, याचे आश्चर्य वाटते. मनुष्य कितीही श्रीमंत असला, तरी श्राद्धविधीत एक देवासाठी आणि एक पितरांसाठी असे केवळ दोनच ब्राह्मण बोलावणे आवश्यक असते. अधिकाधिक पाच ब्राह्मण बोलावले जातात.

इ. अतिथीला भोजन देणे : ‘श्राद्धाच्या वेळी आलेल्या अतिथीला भोजन देणे, म्हणजे पितरांना तृप्त करणे होय; कारण योगी, सिद्धपुरुष आणि देव पृथ्वीवर श्राद्धविधी पहाण्यासाठी हिंडत असतात’, असे पुराणात सांगितले आहे. (म्हणूनच ‘अतिथी देवो भव ।’, असे म्हटलेले आहे.)

ई. श्राद्ध न करता येणार्‍या निर्धन मनुष्यालाही शास्त्रात सोपा उपाय सांगितलेला असणे : तसेच सर्वथा असमर्थ असलेल्या मनुष्याने निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा भावपूर्ण ‘मी निर्धन आणि अन्नविरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा’, असे म्हटले; तरीही श्राद्ध केल्याचे पुण्य लाभते.

उ. प्राप्त परिस्थितीत दक्षिणेला तोंड करून रडणे, हाही श्राद्धविधीच आहे. असे असतांना ‘श्राद्धविधी’ म्हणजे ब्राह्मणांनी उदर-भरणासाठी केलेले कपट असू शकते का ?’

२. (म्हणे) ‘श्राद्ध करणे रानटी आहे आणि त्यापेक्षा दान करणे किंवा सामाजिक संस्थांना देणगी देणे हेच योग्य !’

टीका : श्राद्धविधी रानटी आहे. मातृ-पितृतिथीला त्यांचे छायाचित्र लावून फुले वाहून धूप-दीप लावणे, तसेच त्या निमित्ताने एखादी सामाजिक संस्था, अनाथालय यांना धान्य इत्यादी दान देणे, हेच योग्य आहे.

खंडण

अ. श्राद्धविधी हा शास्त्रोक्त पद्धतीने श्रद्धेने केलेला विधी असल्याने पितर प्रसन्न होणे : श्राद्धविधी म्हणून केवळ दानधर्म योग्य मानणे, म्हणजे ‘रोग एक आणि उपाय दुसरा !’ श्राद्धविधी म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रांसहित पूर्ण श्रद्धेने केलेला विधी होय. श्राद्ध न करता भावनेपोटी दान केले, तर त्याने पितर प्रसन्न होत नाहीत; कारण त्या दानाचे फळ पितरांना मिळत नाही.

आ. श्राद्धविधी न केल्यास अतृप्त पितरांनी रक्त प्यायल्याने शारीरिक दोष निर्माण होऊन त्याचा परिणाम संततीवर होणे : ‘अतर्पिताः पितरः रुधिरं पिबन्ति।’ म्हणजे ‘ज्यांचे श्राद्ध केले जात नाही, ते अतृप्त पितर श्राद्ध न करणार्‍यांचे रक्त पितात.’ रक्ताची अधिष्ठात्री देवता पितर आहेत. शास्त्राप्रमाणे श्राद्धादी विधी न केले, तर ते रक्तात अतीसूक्ष्म दोष निर्माण करतात. रक्तदोषांमुळे वीर्य दुर्बलता आल्यामुळे संतती दुबळी, अपंग आणि विविध रोगांनी ग्रस्त होते.

इ. श्राद्धादी शास्त्रकर्मांनी मृत पितरांना शक्ती प्राप्त होणे : पितरांच्या वायूरूप सूक्ष्मदेहात श्राद्धादी शास्त्रकर्मांनी शक्ती प्राप्त होते. मृत्यूनंतर दुसरा देह (यातनादेह) घेऊन जीव परलोकी गमन करतो. तो प्रेतरूप, अशरीरी असतो, म्हणजे त्याला देह नसतो. त्याला नवीन देह प्राप्त व्हावा, यासाठी श्राद्ध आणि और्ध्वऐहिक क्रिया आवश्यक आहे.’

यावरून लक्षात आले असेल की, श्राद्धविधी म्हणून केवळ दानधर्म करणे अयोग्य !

३. (म्हणे) ‘जीवित पिता, पितामह प्रभृतींचा सत्कार करणे म्हणजे श्राद्ध !’

टीका : ‘जिवंत पिता, लौकिक पितामह, प्रपितामह प्रभृतींचा सत्कार हेच श्राद्ध.’ – दयानंद स्वामी, संस्थापक, आर्य समाज

खंडण

अ. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होत असणे : हे विधान करतांना स्वामी दयानंद मनूच्या ज्या श्लोकांचा संदर्भ देतात, त्यातून उलट हेच स्पष्ट केले आहे की, पिता जीवित असता त्याचे श्राद्ध होऊच शकत नाही. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होते.

आ. श्राद्ध विधीमुळे होणारे आध्यात्मिक लाभ : पृथ्वीवर (दक्षिण दिशेला भूमी उकरून तिथे दर्भ पसरवून तीन पिंड ठेवायचे) तीन पिंड दान केले की, नरकस्थित असलेल्या पितरांचा उद्धार होतो. पुत्राने मृत पित्याचे श्राद्ध हर प्रयत्नाने करावे. त्यांचे नाव आणि गोत्र विधीवत उच्चारून पिंडदानादी करण्याने त्यांना हव्य-कव्याची प्राप्ती होते. यामुळे त्यांच्या अतृप्त वासना पूर्ण झाल्याने ते तृप्तात्मे साहजिकच त्या कुटुंबाला त्रास देत नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांना गती मिळून ते पुढील लोकांत जातात. ‘श्राद्ध केल्याने त्याचे परिणाम चांगले होतात’, हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

यामुळे आर्यसमाजी आणि आधुनिक यांचे वरील वक्तव्य चुकीचे आहे, हे दिसून येते; कारण तसे असते, तर श्राद्धात जे मोठे विधी-विधान आहे, त्याची काय आवश्यकता राहिली असती ?’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, डिसेंंबर २००८ आणि जानेवारी २००९)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)