पनवेल येथील अवैध मदरशावर कारवाई करा ! – योगेश चिले, मनसे, पनवेल शहर अध्यक्ष

पनवेल, ९ सप्टेंबर (वार्ता.) – पनवेल येथील अवैध मदरशावर कारवाई करून तो त्वरित बंद करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेचे पनवेल महानगराचे शहर अध्यक्ष योगेश चिले यांनी पनवेल पोलिसांना दिली आहे. या विषयीचे एक निवेदन त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि धर्मदाय आयुक्त यांनाही दिले आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना दिलेल्या या निवेदनात योगेश चिले यांनी पुढील सूत्रे दिली आहेत.

१. पनवेल साईनगर येथील न्यू साईकृपा को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या गाळा क्रमांक १ आणि २ मध्ये चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली अवैध मदरसा चालू करण्यात आला आहे.

२. मागील ५ मासांपासून या सोसायटीतील रहिवासी या विरोधात पोलीस अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार करत आहेत; परंतु दुर्दैवाने यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

३. हे गाळे वाणिज्य वापरासाठी असूनही ट्रस्ट ‘गुलशन ए रझा’च्या वतीने आरोग्य पडताळणी शिबिर आणि आधार कार्ड शिबिर घेण्यात आले.

४. शिबिराचे फलक लावून सकाळ-संध्याकाळ नमाज पठण, उर्दू शिकवणी आणि समाज एकत्रिकरण करणे चालू केले आहे.

५. या अवैध मदरशामुळे साईनगर परिसरात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करून हा मदरसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी योगेश चिले यांनी पोलिसांकडे केली आहे.

संपादकीय भूमिका

मदरशांमधून आतंकवादी कारवाया होत असल्याचे उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वतःहून असे मदरसे बंद करणे अपेक्षित असतांना वारंवार नागरिकांनी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस देशात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना शोधून काढून कठोर कारवाई करतील याची शक्यता तरी आहे का ?