जगभरातील विचित्र अंधविश्वास

श्रद्धा आणि विश्वास यांत भेद आहे. विश्वास अंध असू शकतो; परंतु श्रद्धा ही डोळस असते. याचे कारण श्रद्धा ही अनुभूतीवर आधारित असते. धर्म म्हणजेच ईश्वर याच्यावरील श्रद्धेच्या बळावरच लक्षावधी हिंदूंनी अध्यात्मात प्रगती करून ईश्वरप्राप्ती केली आहे अन् करत आहेत. ‘सत्य धारण करण्याची क्षमता’ म्हणजे ‘श्रद्धा’ अशीही श्रद्धेची एक व्याख्या करता येईल. प्रस्तुत लेखात विविध देशांतील अंधविश्वासाची काही उदाहरणे दिली आहेत. हा लेख ‘श्रीमत् पूर्णानंदाय नमः’ या मासिकातून आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.

१. तुर्कस्तान

‘रात्री ‘च्युइंग गम’ खाणे म्हणजे मृतदेहाचे मांस खाण्यासारखे आहे’, असे तुर्की लोकांना वाटते.

२. स्पेन

अ. नववर्षाच्या पूर्वसंध्येला घड्याळाचे दोन्ही काटे बारावर येतात, तेव्हा स्पेनमधील अंधविश्वासू लोक शुभेच्छा देण्यासाठी बारा द्राक्षे खातात.

आ. नव्या वर्षात आपल्यावर ग्रहांची कृपा व्हावी, यासाठी काही स्पॅनिश माणसे बादलीभर पाणी खिडकीच्या बाहेर टाकतात.

३. आयर्लंड

हिवाळा संपतांना दारासमोरील पायपुसणे विणले, तर ‘हिवाळ्याचा कालावधी वाढतो’, असा समज आयर्लंडमध्ये आहे.

४. रशिया

अ. एखादा पक्षी अंगावर, ‘कार’वर किंवा स्थावर मालमत्तेवर शिटला (विष्ठा करणे), तर ते चांगले लक्षण समजतात आणि ‘तो श्रीमंत होणार असल्याची खूण आहे’, असे समजले जाते.

आ. त्याचप्रमाणे रशियात स्त्रियांना क्रमांक आणि रंग देतांना सावधानता बाळगावी, असे मानले जाते.

इ. समान आकड्याची फुले ही मृत व्यक्तीसाठी असतात आणि ‘स्त्रीला पिवळी फुले किंवा पिवळा गुलाब देणे, हे व्यभिचाराचे लक्षण आहे’, असे मानले जाते.

५. अर्जेंटिना

अ. वर्ष २००१ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीला कारणीभूत असलेले अर्जेटिनाचे माजी अध्यक्ष कार्लोस मेनेम यांचे नाव घेण्याचे टाळतात. ‘मेनेम म्हणजे जिवंत शाप आहे’, असे त्यांना वाटते.

आ. मेनेम यांचे नाव कानावर पडले की, स्त्रिया स्वतःच्या डाव्या उरोजाला (स्तनांना) हात लावतात, तर पुरुष डाव्या वृषणाला (अंडकोषाला) हात लावतात.

६. जर्मनी

जर्मनीत मृत्यू होतांना कुणाला त्रास होत असेल, तर छतावरच्या तीन टाईल्स काढून मरण सोपे करता येते.

७. फ्रान्स

पाव (ब्रेड) देतांना किंवा टेबलावर ठेवतांना वरची बाजू खाली करून दिल्यास चांगली भूक लागते.

८. ग्रीस

जर अविवाहित तरुणीने झोपतांना उशाशी पवित्र बदामांची छोटी पिशवी ठेवली, तर ‘तिला तिच्या भावी जोडीदाराची स्वप्ने पडतात’, असा प्राचीन विश्वास ग्रीसमधील लोकांचा आहे.

९. चीन

चीनमधील समजुतीप्रमाणे केसांनी कपाळ झाकल्यास, त्या व्यक्तीच्या संपत्तीत गंभीर अडथळा निर्माण होतो. ‘पुरुषांच्या कपाळाकडे यश आकर्षित होते’, असा चीनमध्ये समज आहे.’

(साभार : मासिक ‘श्रीमत् पूर्णानंदाय नमः’, दिवाळी विशेषांक २०१४)