नाशिक येथील सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार !

गाभारा देखभाल दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण नाही !

नाशिक – जिल्ह्यातील वणी येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेले सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार आहे. मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. ६ सप्टेंबरपासून भाविकांसाठी मंदिर खुले होणार होते; परंतु अद्यापही काही काम अपूर्ण असल्याने मंदिर २१ सप्टेंबरपर्यंत खुले करण्यात येणार नाही. काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी मंदिरातील प्रदक्षिणामार्गाची पुराच्या पाण्यामुळे हानी झाली होती. यामुळे काही भाविक घायाळ झाले होते. त्यानंतर सप्तशृंगी गडावरील भगवती मूर्तीचे संवर्धन आणि गाभारा देखभाल दुरुस्तीसाठी २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत मंदिर बंद ठेवण्यात आले होते; परंतु दीड मासांनंतरही काम पूर्ण न झाल्याने पितृपक्षानंतर मंदिर खुले होणार आहे. पुढील ३ दिवस देवीच्या मंदिरात विविध पूजा होणार आहेत. संपूर्ण पितृपक्षात १ सहस्र ६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान होणार आहे. सप्तश्रृंगीच्या नांदुरी गडावर साधारण ६०० छोटे-मोठे व्यावसायिक असून येणार्‍या भाविकांवरच येथील सर्व उद्योगधंदे अवलंबून आहेत. त्यामुळे गावाचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्य-प्रसाद विक्रेते, उपाहारगृहे आणि टॅक्सीचालक या सर्वांचाच यात समावेश आहे.