सकारात्मक राहून सेवा स्वीकारल्यास देवाचे साहाय्य मिळून सेवा करण्याची क्षमताही वाढते !

सेवेच्या संदर्भात कसा दृष्टीकोन ठेवावा याविषयी देवद आश्रमातील साधकांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन

देवद आश्रमातील काही साधकांनी एक सेवा करण्यास नाकारले. त्या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.


सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. प्रसंग

चहासेवा करणार्‍या साधकांच्या एका गटातील काही साधक गावाला गेल्यामुळे या गटाची चहासेवा न्यून केली जाणे; पण ते साधक गावाहून परत आल्यावरही या गटाने चहासेवा न स्वीकारणे : ‘साधकांच्या एका गटाकडे आठवड्यातील ४ दिवस आश्रमातील साधकांसाठी सकाळचा चहा करण्याची सेवा होती. एकदा या गटातील काही साधक गावाला गेल्याने आणि या गटातील साधक करत असलेली सेवा वाढल्याने अल्पाहार सेवेचे नियोजन करणार्‍या साधकाने या गटाची आठवड्यातील २ दिवसांची चहासेवा केली. काही दिवसांनी गावाला गेलेले साधक परत आल्यावर अल्पाहार सेवेचे नियोजन बघणार्‍या साधकाने या गटाला विचारले, ‘‘आता तुम्ही पुन्हा आठवड्यातून ४ दिवस चहासेवा करू शकता ना ?’’ तेव्हा या गटातील साधकांनी त्यांना सेवेतील अडचणी सांगून सांगितले, ‘‘आम्ही चहासेवा करू शकत नाही आणि जमले, तर थोडा वेळ साहाय्य करू शकतो.’’

– श्री. राम पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल (११.१.२०२१)

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी दिलेले दृष्टीकोन

२ अ. साधकांचे ‘सेवेचे नियोजन कसे करता येईल ?’, यापेक्षा ‘सेवा कशी टाळता येईल ?’, याकडे लक्ष असल्यामुळे साधना न होणे : या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे म्हणाले, ‘‘साधक गावाला गेले होते, त्या कालावधीत तुमची २ दिवसांची चहासेवा अन्य साधकांनी केली. साधक गावाहून परत आल्यानंतर तुम्ही स्वतःहून ‘आता आम्ही पुन्हा पूर्वीप्रमाणे आठवड्यातून ४ दिवस चहासेवा करू शकतो’, असे सांगायला हवे होते; परंतु तुम्ही तसे केले नाही. या प्रसंगात तुमची ‘सेवा कशी करू शकतो ? यापेक्षा ‘सेवा कशी करू शकत नाही’, या दृष्टीनेच विचारप्रक्रिया झाली. त्यामुळे तुमची साधना झाली नाही.

२ आ. ‘अधिक सेवा करू शकत नाही ?’, या दृष्टीने विचार केल्याने होणारी हानी

१. ‘सेवेचे नियोजन कसे होऊ शकते ?’, या दृष्टीने विचारसरणी नाही’, हीच मोठी चूक आहे.

२. ‘देव सेवा का देतो ?’, हे साधकांच्या लक्षात येत नाही.

३. ‘सेवा कशी करू शकत नाही’, या दृष्टीने, म्हणजे सेवेपासून परावृत्त होण्याच्या दृष्टीनेच विचार केल्याने साधकांना देवाचे साहाय्य मिळत नाही.

४. आपण नसलो, तरी सेवा होते. देवाचे कार्य कुणावाचून थांबून रहात नाही. साधक नसतांनाही कार्य होते, म्हणजे देवाला अशक्य असे काहीच नाही. तो काहीही करू शकतो; पण ‘देवच सर्व करून घेणार आहे’, यावर साधकांची श्रद्धा नसल्याने त्यांना तशा अनुभूती येत नाहीत.

५. साधक परेच्छेने वागायला शिकले नाहीत. त्यामुळे त्यांना ईश्वरेच्छा, म्हणजे देवाची इच्छा कळत नाही.

६. एखादा साधक अडचण सांगून साहाय्य मागतो. तेव्हा त्याला थेट ‘नाही’, म्हटले की, त्याच्यासाठी आपले दार बंद होते. तो आपल्याला पुढे काही विचारूच शकत नाही.

२ इ. सर्व साधकांशी बोलून सेवेचे नियोजन केल्यास साधक सेवा करण्यास सिद्ध होणे, त्यामुळे गटातील  साधकांची अन् उत्तरदायी साधकाचीही साधना होणे : साधकांनी स्वतःमध्ये सेवेविषयी सकारात्मकता निर्माण करायला हवी. त्यालाही साधनेत गुण आहेत. त्यासाठी उत्तरदायी साधकाने गटातील सर्व साधकांशी एकत्रित बोलल्यास आणि सर्वांनी झोकून देऊन सेवा करण्याचे ठरवल्यास साधक सेवा करण्यास सिद्धही होतात. तसे झाल्यास गटातील सर्व साधकांसह योग्य निर्णय घेतल्याने उत्तरदायी साधकाचीही साधना होते. देवाच्या कार्यामध्ये सहभाग होतो आणि आश्रमातील सेवाही सुरळीत होतात. एखाद्या वेळी ‘सांगितलेली सर्वच सेवा जमेल’, असे नाही; परंतु ‘प्रयत्नच करणार नाही’, हे चुकीचे आहे.’

– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल (११.१.२०२१)