२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी देवद पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आपण त्यांच्या पत्नी सौ. मीनल राजेंद्र शिंदे आणि अन्य साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज अन्य साधकांना सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.
‘सर्वसाधारण सुसंस्कारी कुटुंबात वयस्कर व्यक्तींना दादा, काका, तात्या किंवा भाऊ इत्यादी नावांनी (उपनाम किंवा टोपणनाव) संबोधले जाते. त्या शब्दांतून त्यांच्याप्रती असलेला आदर आणि प्रेमभाव व्यक्त होतो. ती वडीलधारी व्यक्ती घरच्या सदस्यांना प्रेम देऊन त्यांचा सांभाळ करते आणि प्रसंगानुसार त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवते. त्यामुळे घरातील इतर सदस्य तिच्याशी जवळीक करतात आणि आपल्या समस्यांवर उपाय विचारून तिचे मार्गदर्शन घेतात. कुटुंबियांना आधार देण्याच्या या तिच्या कृतींमुळेच तिला मिळालेल्या उपनावाचे महत्त्व कळते.
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना देवद (पनवेल) आश्रमातील सर्व साधक ‘सद्गुरु दादा’ या नावाने संबोधत असणे
देवद आश्रमात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची ओळख ‘सद्गुरु दादा’ या शब्दांमुळेच होते. देवद आश्रमातील सर्व साधकांना ‘सद्गुरु दादा’ हे स्वत:चा कुटुंबातीलच एक असून ‘ते सर्वार्थाने सांभाळ करणारे आपले ‘दादा’ आहेत’, असे वाटते. ‘दादा’ या शब्दामुळे त्यांच्यामध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये प्रतिबिंबित होतात.
२. ‘दादा’ या शब्दाचा जाणवणारा भावार्थ !
२ अ. ‘दादा’ या शब्दातील पहिल्या ‘दा’ या अक्षराचा अर्थ ‘कुटुंबियांचे दायित्व वहाणारा आणि त्यांना प्रेमाने सांभाळणारा’, असा जाणवणे : ‘दादा’ या शब्दातील प्रथम अक्षर ‘दा’, म्हणजे दायित्व घेणे, सांभाळ करणे, घडवणे, काळजी वहाणे इत्यादी. आश्रमातील साधकांची प्रेमाने (प्रीतीने) विचारपूस करणे, त्यांना प्रेरणा देणे, त्यांचा उत्साह वाढवणे आणि त्यांचे कौतुक करणे इत्यादी सर्व कृती सद्गुरु दादा अत्यंत कुशलतेने करतात. त्या समवेत ते ‘साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासावर उपाय शोधून देऊन ‘त्यांचा त्रास न्यून झाला कि नाही ?’, याचा पाठपुरावाही घेतात. ते सर्व आश्रमात फिरून साधक करत असलेल्या सेवेविषयी पृच्छा करतात. या सर्व कृती, म्हणजे सद्गुरु दादा साधकांचे दायित्व पार पाडत असल्याचेच द्योतक आहे.
२ आ. दुसर्या ‘दा’ या अक्षराचा भावार्थ ‘आपल्याजवळ जे आहे, ते इतरांना दान देणे’, असा जाणवणे : ‘दादा’ या शब्दातील दुसर्या ‘दा’ या अक्षराचा भावार्थ ‘दा’ म्हणजे ‘दान देणे’, असा मला जाणवतो. आपल्याजवळ जे काही आहे, ते साधकांना देणे. येथे ‘देणे’ हे ज्ञानाच्या संदर्भात आहे. ‘आपल्या ठायी असलेल्या अध्यात्मज्ञानाचा साधकांना कसा लाभ होईल ?’, याकडे सद्गुरु दादा लक्ष देतात. ते ‘आश्रमातील साधकांची साधनेत प्रगती व्हावी’, यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात, आढावा सत्संगात त्यांना विषय समजावून सांगतात, साधकांकडून होणार्या चुकांकडे लक्ष देऊन त्या चुका न्यून होण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करवून घेतात आणि ‘स्वभावदोष निर्मूलन करून प्रगती कशी करावी ?’, याविषयी त्यांना मार्गदर्शन करतात. यातून सद्गुरु दादा साधकांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवतात.
३. ‘दादा’ या शब्दांमधील दोन्ही ‘दां’चा सुंदर संगम असलेले सद्गुरु दादा !
‘सद्गुरु राजेंद्रदादांमध्ये या दोन्ही ‘दां’चा सुंदर संगम आहे’, हे क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. ते आश्रमात वावरत असतांना त्यांना पहाताक्षणी त्यांच्या ओठांवरचे स्मितहास्य पाहून आपले मन प्रसन्न होते. सेवा अन् साधना करण्याचा उत्साह द्विगुणित होतो. खरोखरंच, ते सनातन परिवारातील सर्वांचे आवडते ‘दादा’ आहेत !’
– श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.३.२०२१)