बांगलादेशातील १० लाख रोहिंग्या मुसलमान हे मोठे ओझे ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

भारत या समस्येवर तोडगा काढण्यात साहाय्य करू शकत असल्याची शेख हसीना यांना आशा !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात १० लाखाहून अधिक रोहिंग्या मुसलमान आहेत. हे आमच्यासाठी मोठे ओझे आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. भारत हा मोठा देश आहे, तुम्ही त्यांना सामावून घेऊ शकता. (रोहिंग्यांना सामावून घेण्यासाठी भारत काय धर्मशाळा आहे का ? – संपादक)  आम्ही केवळ तुमच्याविषयी बोलत नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय आणि शेजारी देशांशी बोलून रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या देशात परत जाण्यासाठी त्यांनी काही पावले उचलायला हवीत, असे विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे. त्या उद्या, ५ सप्टेंबरला ४ दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहेत. तत्पूर्वी त्यांनी हे विधान केले आहे. ‘रोहिंग्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो’, असेही त्यांनी म्हटले आहे. (अशा विधानांना भारताने बळी पडू नये ! – संपादक)

शेख हसीना म्हणाल्या की, आम्ही रोहिंग्यांना मानवतावादी आधारावर आश्रय दिला होता. आवश्यक सर्वकाही प्रदान केले आहे. कोरोनाच्या काळात सर्व रोहिंग्यांचे लसीकरणही करण्यात आले; पण ते येथे किती दिवस असतील ? ते छावणीत जगत आहेत. अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रे, महिलांची तस्करी या गुन्हेगारी कृत्यात  काही जण पकडले जातात. ते जितक्या लवकर त्यांच्या देशात जातील तितके चांगले.

भारत बांगलादेशचा ‘परीक्षित मित्र’

(ज्याने कठीण काळात मैत्री निभावली, त्याला ‘परीक्षित मित्र’ असे म्हणतात.)
शेख हसीना यांनी भारताला बांगलादेशचा ‘परीक्षित मित्र’ म्हटले. त्या म्हणाल्या की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आमचे अनेक विद्यार्थी पूर्व युरोपमध्ये अडकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने त्यांना भारतात आणण्यात आले. भारत सरकार भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्यात गुंतले असतांना त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अडचणीत सोडले नाही. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनाही घरी आणले. भारताने ‘लस मैत्री’ कार्यक्रमाच्या अंतर्गत बांगलादेशला लसीची अनेक डोस पाठवले. हेदेखील कौतुकास्पद आहे. शेजारी देशांमधील सहकार्य भक्कम ठेवण्यावर त्यांनी भर दिला. भारत आणि बांगलादेश यांच्यात मतभेद असू शकतात; मात्र ते चर्चेतून सोडवले जावेत, असेही त्या म्हणाल्या.

  • मुसलमानबहुल देशातील एका महिला मुसलमान पंतप्रधानाला जर असे वाटते, तर भारतातील रोहिंग्याप्रेमी मुसलमान आणि निधर्मीवादी यांना असे का वाटत नाही ?
  • भारताने या संदर्भात काय साहाय्य करणार ? बांगलादेश हा इस्लामी देश आहे. त्यामुळे रोहिंग्या मुसलमानांची समस्या ही इस्लामी देशांची समस्या आहे. जर बांगलादेशाला त्यांना सामावून घ्यायचे नसेल, तर त्यांना सामावून घेण्यासाठी अन्य इस्लामी देशांनी पुढे यायला हवे !