स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर असणारी आय.एन्.एस्. विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाकडे सुपुर्द

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोहळा !

  • नौदलास स्वदेशी चिन्हाचा ध्वज प्रदान !

भारताचा आत्मविश्‍वास वाढवणारी ही विक्रांत !

कोच्ची – ७६ टक्के स्वदेशी तंत्रज्ञान वापरून सिद्ध केलेली नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी आय.एन्.एस्. विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आता खडतर चाचण्यांनंतर नौदलाच्या ताफ्यात भरती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील कोच्ची येथे याचा प्रत्यार्पण सोहळा पार पडला. कोच्ची शिपयार्ड येथे बांधलेली ही नौका म्हणजे प्रकारे एक तरंगते विमानतळच आहे. २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशा या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोठी भर पडणार आहे. ‘पुढील काळातील २५ वर्षांची भक्कम सुरक्षा या युद्धनौकेमुळे होणार आहे’, असे उद्गार रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी या उद्घाटनप्रसंगी काढले.

आत्मनिर्भर भारताचे प्रतीक ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्‍वक्षितीजावर भारताला बळकट करणार्‍या ध्येयाचा हुंकार आहे. क्रांतीकारकांनी सक्षम भारताचे स्वप्न पाहिले, त्याची ही सशक्त प्रतिमा आहे. भारताचा आत्मविश्‍वास वाढवणारी विक्रांत ही २१ व्या शतकातील भारताचे परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि प्रतिबद्धता यांचे प्रमाण आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी या वेळी गौरवोद्गार काढले.

नरेंद्र मोदी यांनी मांडलेली अन्य सूत्रे . . .

इंग्रजांनी भारतीय जहाजांवर घातले होते निर्बंध

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर असे नौदल उभारले, ज्यामुळे शत्रूंची झोप उडाली.

२. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची शक्ती आणि त्याद्वारे होणारा व्यापार यांची भीती वाटायची. म्हणूनच त्यांनी भारताच्या सागरी शक्तीचे कंबरडे मोडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी ब्रिटीश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापारी यांच्यावर कडक निर्बंध लादले गेले.

३. जेव्हा ‘विक्रांत’ देशाच्या सागरी क्षेत्राच्या रक्षणासाठी उतरेल तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकही जहाजावर तैनात असतील. महासागराच्या अफाट शक्तीने, अमर्याद स्त्रीशक्तीने ती नव्या भारताची उदात्त ओळख बनत आहे. आता भारतीय नौदलाने महिलांसाठी त्याच्या सर्व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

४. जे निर्बंध होते, ते आता हटवले जात आहेत. ज्याप्रमाणे सागराच्या समर्थ लाटांना सीमा नसतात, त्याचप्रमाणे भारतातील महिलांनाही आता कोणत्याही सीमा किंवा बंधने नाहीत. थेंब थेंब पाण्यानं अथांग महासागर बनतो. त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकाने ’वोकल फॉर लोकल’ हा मंत्र जगायला सुरुवात केली तर देश स्वावलंबी व्हायला फारसा वेळ लागणार नाही”, असं मोदी म्हणाले.

नौदलाचा ध्वज पालटून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार असलेल्या नौदलाच्या ध्वजाचे अनावरण

या वेळी नौदलाचा सेंट जॉर्ज क्रॉसचे चिन्ह असलेला ध्वज हटवण्यात आला. त्याच्या जागी पांढर्‍या पार्श्‍वभूमीवर डाव्या बाजूस तिरंगा आणि उजव्या बाजूस निळ्या रंगाचा राजमुद्रेचा आकार असलेल्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. या ध्वजात सोनेरी रंगाचे अशोकचिन्ह असून त्याखाली ‘शं नो वरुणः ।’ ( अर्थ : जलाची देवता वरुण आमच्यासाठी मंगलकारी आहे.) असे संस्कृत वचन लिहिण्यात आले आहे. नौदलाची आवश्यकता ओळखून त्याचा विस्तार करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार या ध्वजावर घेण्यात आला आहे.

.एन्.एस्. विक्रांतची वैशिष्ट्ये

१. स्वबळावर आराखडा बनवून युद्धनौकेची बांधणी
२. एकाच वेळी ३० पेक्षा अधिक विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर हाताळण्याची क्षमता
३. ४० ते ४५ सहस्र टन वजन
४. एका दमात म्हणजे कुठेही न थांबता १५ सहस्र कि.मी. पल्ला गाठण्याची क्षमता
५. विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी ‘बराक-८’ ही क्षेपणास्त्र तैनात
६. १ सहस्र ४०० पेक्षा अधिक नौसैनिक, अधिकारी आणि कर्मचारी तैनात
७. ५ सहस्र घरांना पुरेल एवढी वीज निर्माण करण्याची क्षमता

शेष…..

फेब्रुवारी २००९ मध्ये विक्रांतच्या बांधणीला आरंभ होऊन ऑगस्ट २०१३ मध्ये युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. त्यानंतर विविध उपकरणे युद्धनौकेवर बसवून युद्धनौकेचे मुख्य इंजिन, रडार, संदेशवहन यंत्रणा, विविध अन्य उपकरणे यांच्या ४ खडतर चाचण्या घेण्यात आल्या.
ब्रिटिशांच्या युद्धनौकेची डागडुजी करून भारतीय नौदलाने वर्ष १९६१ मध्ये आणलेली पहिली विमानवाहू युद्धनौका १९९७ ला निवृत्त झाली होती.