श्री गणेशाची असात्त्विक मूर्ती सिद्ध करणे, हे विडंबनच !

श्री गणेशाची विविध रूपे आहेत; परंतु त्यामुळे ‘श्री गणेशाला आपण हव्या त्या रूपात दाखवू शकतो’, असा त्याचा अर्थ होत नाही. बहुतांश चित्रकार, शिल्पकार आदी कलाकारांना ‘श्री गणेश विविध रूपांमध्ये दाखवता येतो’; म्हणून तो अधिक आवडतो. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांना हे ज्ञात नसते की, स्वतःच्या मनाला हवे तसे वेडेवाकडे श्री गणेशाचे रूप रेखाटल्याने त्यांच्याकडून श्री गणेशाचा अवमान होतो आणि ‘कर्मफलन्याय’ या सिद्धांताप्रमाणे त्या कृतीचे त्यांना पाप लागते. जसे स्वत:च्या आई-वडिलांचा अवमान केलेला किंवा त्यांचे चित्र-विचित्र चित्र काढलेले कुणाला आवडणार नाही, तसेच माता-पित्यांपेक्षाही श्रेष्ठ असणार्‍या देवतांचे ‘कार्टुन’ किंवा अन्य चित्र-विचित्र पोशाखातील चित्र, प्रतिमा, आकृती, शिल्प किंवा मूर्ती निर्माण करणे, हे अयोग्य आहे.

श्री गणपतीच्या संदर्भातील विडंबनाची काही उदाहरणे !

देवतांचे विविध प्रकारे विडंबन होते, उदा. हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून ती विक्रीसाठी ठेवली; व्याख्याने, पुस्तके आदींच्या माध्यमातून देवतांवर टीका केली जाते; देवतांची वेशभूषा करून भीक मागितली जाते, व्यापारी हेतूने विज्ञापनांमध्ये (जाहिरातींमध्ये) देवतांचा ‘मॉडेल’ म्हणून वापर केला जातो. नाटक-चित्रपटांतूनही विडंबन सर्रास होते. फटक्यांवरही देवतांची चित्रे छापली जातात. देवतांची चित्रे असलेले फटाके वाजवल्यावर त्या चित्रांच्या चिंधड्या उडतात. हेसुद्धा एक प्रकारचे देवतांचे विडंबनच ठरते.

१. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’ने दुचाकीस्वारांचा अपघात टाळण्यासाठी मार्गाच्या (रस्त्याच्या) कडेला विज्ञापनाचा फलक लावला. त्या फलकावर श्री गणपतीला विडंबनात्मक रूपात प्रदर्शित केले. ‘मला दुसरे डोके मिळाले. तुम्हाला मिळेल का ? हेल्मेट वापरा !’, असे श्री गणपति सांगत असल्याचे त्या विज्ञापनात दाखवले होते.

२. बहुतेक जण घरात शोकेसमध्ये श्री गणेशाच्या मूर्ती ‘शो-पीस’ म्हणून ठेवतात. त्यांची पूजा-अर्चा होत नाही.

३. अनेक जण श्री गणेशाच्या विविध आकारांतील ‘फ्रेम’ घरांत लावतात. त्यांचीही पूजा होत नाही.

४. काही मूर्ती या क्रिकेट खेळणार्‍या बनवतात. विद्यार्थी किंवा सैनिक यांचा गणवेष घातलेला गणपति अशा प्रकारच्या  किंवा काही संत किंवा अन्य देवता यांचे आकार घेऊन बनवलल्या मूर्ती सिद्ध करतात, त्यांतूनही श्री गणेशतत्त्वाची स्पंदने येत नाहीत.

५. काही वेळा श्री गणेशाचे ‘कार्टून’ केलेले असते, तर काही वेळा केवळ सोंड, डोळे किंवा कान यांचा आकार विज्ञापनात वापरलेला असतो.

६. चॉकलेट, खिळे, बाटल्या, लोखंडी स्पेअर पार्ट्स आदी विविध गोष्टींपासून श्री गणेशाची मूर्ती किंवा आकृती सिद्ध करतात, त्यातून श्री गणेशतत्त्वाची स्पंदने येणे कठीण असते.

देवतांचे विडंबन रोखणे, ही समष्टी स्तराची उपासना !

देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे. ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे. ही उपासना केल्याविना देवतेची उपासना पूर्ण होऊच शकत नाही. यास्तव गणेशभक्तांनीही याविषयी जागरूक होऊन धर्महानी रोखायला हवी.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक