राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आस्थापनाची ‘ईडी’कडून चौकशीला प्रारंभ !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार संचालक असलेल्या ‘ग्रीन एकर रिसॉर्ट्स अ‍ॅण्ड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाच्या प्राथमिक चौकशीला अंमलबजावणी संचानलयाकडून (‘ईडी’कडून) प्रारंभ करण्यात आला आहे. ईडी स्वतःच्या अन्वेषणात या आस्थापनाचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअरधारक आणि संचालक यांची आर्थिक देवाण घेवाण यांचे बारकाईने अन्वेषण करणार आहे. ‘ईडी’ला यात ‘मनी लॉन्डरिंग’ झाले किंवा नाही, याचे अन्वेषण करायचे आहे.

या आस्थापनात वर्ष २००६ ते २०१२ पर्यंत रोहित पवार हे संचालक होते, तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हेही वर्ष २००६ ते २००९ पर्यंत या आस्थापनात संचालक होते. त्याचसमवेत या आस्थापनात असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या कारागृहात असलेल्या ‘एच्.डी.आय.एल्’ आस्थापनाचे मालक राकेश वाधवान यांच्यासमवेत इतर आस्थापनात भागीदार आहेत. यादृष्टीने ‘ईडी’चे अन्वेषण चालू आहे. यामध्ये बाबासाहेब सूर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार आणि अरविंद पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर आस्थापनातून बाहेर पडले, त्यानंतर हळूहळू इतर ४ सदस्य या आस्थापनातून बाहेर पडले. त्यामुळे ‘ईडी’ने या संपूर्ण प्रकरणात रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्यासमवेतचे संबंध पहाता प्राथमिक अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.

प्रतिक्रिया…

‘‘राजकीय सूडापोटी रोहित पवार यांचे नाव अडकवण्यात आले आहे. ‘ईडी’चा वापर हा राजकीय विरोधकांसाठी केला जात आहे, कारण नसतांना रोहित पवार यांचे नाव घेण्यात आले आहे. महागाई आणि बेरोजगारी याविषयी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीचे जे नेते बोलत आहे, त्यांना ‘ईडी’च्या फेर्‍यात अडकवले जात आहे’’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.