महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखा यांच्या नियोजन अन् समन्वय अभावी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडी नित्याची !

प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखा यांच्या नियोजनाअभावी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. अगोदरच शहरात पुरेशा प्रमाणात गाड्या लावण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नाहीत आणि कोरोनाकाळापासून चारचाकी वाहनांची संख्या वाढलेली आहे यामुळे नागरिकांना वाहने लावायची कुठे ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर, तर हा प्रश्‍न आता फारच बिकट होणार असून गणेशभक्तांनाही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

१. वाढते शहर पहाता त्यासाठी पुरशी वाहनतळे उपलब्ध होण्यासाठी महापालिका प्रशासन, वाहतूक शाखा यांनी अगोदरच प्रयत्न करणे अपेक्षित असते; मात्र तसे कोणतेच नियोजन न झाल्याने इमारतींची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली-वाहने वाढली आणि ती लावण्यासाठी जागाच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात वाहतूक शाखाही सुस्त असते. यासाठी नियमित समन्वय साधून प्रशासन, वाहतूक शाखा यांची नियमित बैठक आणि त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित असते, तेही होत नाही. कोल्हापूर शहरातील वाहतूक कार्यालय आणि महानगरपालिकेतील अधिकारी यांमध्ये वाहतूक समस्येविषयी समन्वय दिसून येत नाही.

२. शहरात मुख्यत्वेकरून महाद्वार रस्ता, महापालिका चौक, खरी कॉर्नर, बसस्थानक परिसर, शाहूपुरी ४ थी गल्ली, बिंदू चौक ते मिरजकर तिकटी, पार्वती टॉकिज परिसर, अयोध्या टॉकीज ते बिंदू चौक, ताराबाई रोड, राजाराम रोड यांसह शहरात अनेक ठिकाणी आता वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलीस असतात, तर काही ठिकाणी वाहतूक पोलीसच नसल्याने गाड्या पुढे जातील तशाच अन्य प्रवाशांना त्यांच्या गाड्या पुढे नेणे भाग पडते. सायंकाळनंतर तर वाहतूक पोलीस बहुतांश चौकात उपस्थित नसतातच.

३. वाहतूक पोलिसांकडूनही पुरेशी कारवाई वाढत नसल्याने शहरात बेशिस्त वाढत आहे. अपुर्‍या क्रेन्स, काही ठिकाणी अवाजवी अरेरावी, काही ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष यांसह अनेक कारणांमुळे वाहतूक शाखाही वाहनकोंडीत हातभार लावते.

४. या सर्व समस्यांसाठी वाहतनळांसाठी जागा शोधून त्या उपलब्ध करून देणे, बेशिस्त वाहनधारकांवर कठोर कारवाई करणे, महापालिका आणि वाहतूक शाखा यांनी नियमितपणे योग्य समन्वय ठेवणे, ‘मल्टीपल पार्किग’सारख्या पर्यांयांचा विचार करणे अशा उपाययोजना केल्या तरच काही प्रमाणात वाहतूकतुंबा सुटण्यास साहाय्य होईल.

संपादकीय भूमिका

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटली तरी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! तसेच जनतेच्या समस्या सुटण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणार्‍या संवेदनशील व्यक्ती प्रशासनात हव्यात. हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिले जात असल्यामुळे समाज शिस्तप्रिय आणि संवेदनशील प्रशासन असेल !