साधकांसाठी दिवस-रात्र आध्यात्मिक स्तरावर उपाय करणारे आणि श्री गुरूंची संजीवनी देवता (धन्वन्तरि देवता) असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ (वय ५९ वर्षे) !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ५९ वा वाढदिवस २८.८.२०२२ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी झाला. त्यानिमित्त २९ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्रीकृष्णकृपेने साधकाला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भातील लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी साधकांसाठी केलेल्या नामजपादी उपायांमुळे साधकांना आलेल्या अनुभूती ही सूत्रे पाहिली. आजच्या लेखात साधकाला सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती, त्यांच्या देहामध्ये झालेले पालट आणि त्यांचा अन्य संतांप्रतीचा भाव आदी सूत्रे पाहूया.

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  https://sanatanprabhat.org/marathi/608488.html
(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

श्री. भूषण कुलकर्णी

३ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या जागी संपूर्णतः पांढरा शुभ्र गोळा दिसणे : ‘एकदा सद्गुरु काकांनी संत आणि साधक यांच्यासाठी अनुमाने दीड घंटा नामजपादी उपाय केले. काकांचे नामजपादी उपाय झाल्यावर मला केवळ त्यांच्या शरिराची आकृती दिसत होती. मला त्यांच्या जागी संपूर्णपणे पांढरा शुभ्र गोळा दिसत होता आणि खोलीत थंडावा जाणवत होता.

३ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या जागी अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन होणे, तेव्हा त्यांनी स्वतःचे कार्य शिवासारखेच असल्याचे सांगणे : एकदा सद्गुरु गाडगीळकाकांनी अन्य संत आणि साधक यांच्यासाठी वरीलप्रमाणेच नामजपादी उपाय केले. त्यानंतर त्यांचे अस्तित्व न जाणवता काही वेळ मला त्यांच्या जागी अमरनाथ येथील शिवलिंग दिसत होते. जणूकाही त्यांच्या माध्यमातून शिवच कार्य करत आहे.

वरील अनुभूती सद्गुरु काकांना सांगितली असता ते म्हणाले, ‘‘माझे कार्य भगवान शिवासारखेच आहे. शिव वाईट शक्तींचा लय करतो, तसेच माझे कार्य आहे.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘सद्गुरु काकांचे कार्य लय करण्याचे, म्हणजेच ‘साधकांचा त्रास लय करणे’, असे आहे. ते वाईट शक्तींच्या त्रासावर मात करण्यासाठी नवनवीन आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून त्यावर संशोधनही करत असतात.’

३ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कपड्यांना सूक्ष्म आणि प्रत्यक्षही सुगंध येणे : सद्गुरु काकांच्या कपड्यांना इस्त्री करत असतांना मला कधी मंद, मध्यम आणि तीव्र अशा स्वरूपाचे सूक्ष्म सुगंध, तर कधी प्रत्यक्ष सुगंध येतो. हा सूक्ष्म किंवा प्रत्यक्ष सुगंध १ ते दीड फुटापर्यंत जाणवतो. त्यांच्या नित्य वापरातील कपड्यांना मध्यम सूक्ष्म सुगंध, तर आध्यात्मिक प्रयोगासाठी वापरल्या जाणार्‍या कपड्यांना तीव्र सूक्ष्म सुगंध येतो. जे कपडे नवीन आहेत वा अल्प प्रमाणात वापरले जातात, त्यांना मंद सूक्ष्म सुगंध येतो. या सुगंधामुळेही साधकाना चैतन्य मिळून त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

३ ई. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीतील सेवा करतांना साधकाची पाठदुखी न्यून होणे : मला पाठ आणि कंबरदुखी यांचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे मला वाकून सेवा करणे किंवा वजन उचलणे आदी सेवा करता येत नाहीत. मी १५ – २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभा राहिल्यास मला कंबरदुखी चालू होऊन तेथील भागात पुष्कळ वेदना होतात. गेल्या ६ मासांपासून मी सद्गुरु काकांच्या खोलीची स्वच्छता करत असतांना माझी पाठ आणि कंबरदुखी यांचा आध्यात्मिक त्रास ५० टक्के न्यून झाला आहे.

३ उ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून प्रतिदिन केले जाणारे अग्निहोत्र कधी शरणागतभावात, कधी तारक किंवा मारक रूपात, कधी कृतज्ञताभावात, तर कधी शांतीच्या स्वरूपात केले जाणे : सद्गुरु गाडगीळकाका प्रतिदिन एक वेळ अग्निहोत्र करतात. हे अग्निहोत्र करत असतांना काही दिवसांपासून मला ‘ते करत असलेले अग्निहोत्र कधी शरणागतभावाने, तर कधी तारक किंवा मारक रूपात, कृतज्ञताभावात अथवा शांतीच्या स्वरूपात केले जाते’, असे जाणवले. ‘सद्गुरु काकांनी अग्निहोत्र करण्यापूर्वी ते आज कशा पद्धतीने करावे’, याविषयी काहीही ठरवलेले नसते; पण देवच त्यांच्याकडून वरीलपैकी एका पद्धतीने आणि समष्टीला कोणत्या स्वरूपात ते होणे अपेक्षित आहे, तसे होत असते’, असे मला वाटते.

३ ऊ. प्रतिदिन पूजा केल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा कृतज्ञताभाव जागृत होणे : सद्गुरु काका सकाळी स्नानानंतर त्यांच्या खोलीत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा करतात. ही पूजा केल्यानंतर सद्गुरु काका भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांना कृतज्ञतापूर्वक आणि शरणागतभावाने प्रार्थना करतात. सद्गुरु काका करत असलेली ही प्रार्थना इतकी भावपूर्ण असते की, प्रार्थना पूर्ण झाल्यावर त्यांचे डोळे प्रतिदिन पाणावलेले असतात, तर कधी प्रार्थना करत असतांनाच डोळ्यांतून भावाश्रूचा एक थेंब चेहर्‍यावर ओघळतो. याविषयीही सद्गुरु काका एकदा म्हणाले, ‘‘मला दिलेली ही सेवा मी त्यांच्यामुळेच (भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे) करू शकत आहे. माझी तशी क्षमता नाही. तेच माझ्याकडून साधकांना नामजप शोधून देणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून घेतात.’’

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या देहामध्ये झालेले पालट  

अ. सद्गुरु गाडगीळकाकांच्या त्वचेचा स्पर्श लोण्यासारखा मऊ झाला आहे.

आ. त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा आकार उजव्या सोंडेच्या गणपतीसारखा झाला आहे.

इ. बर्‍याच वेळा त्यांचा चेहरा गुलाबी दिसतो, तर काही वेळा एकदम तेजयुक्त पांढरा शुभ्र दिसतो. काही वेळा त्यांचा चेहरा लहान मुलासारखा गोंडस दिसतो. ते मारक स्वरूपात नामजप करतात, त्या वेळी त्यांचा चेहरा आणि शरिराचा काही भाग लालबुंद होतो.

ई. त्यांच्या देहाभोवती ४ फुटापर्यंत सूक्ष्म सुगंध दरवळत असतो.

५. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ निवास करत असलेल्या खोलीत झालेले पालट

अ. खोलीतील कोटा फरशी गुळगुळीत झाली आहे, तसेच फरशीवर व्यक्तीचे प्रतिबिंब उमटते.

आ. सद्गुरु काकांची खोली काही वेळा खोल निर्गुण पोकळी जाणवते.

इ. सद्गुरु काकांनी कुणी संत आणि साधक यांच्यावर मारक स्वरूपात नामजपादी उपाय केल्यावर त्यांची खोली पुष्कळ प्रकाशमान झालेली दिसते.

ई. सद्गुरु काकांच्या खोलीत आवश्यकतेनुसार तारक-मारक स्वरूपातील मंद, मध्यम किंवा तीव्र सूक्ष्म सुगंध येतो. हा सूक्ष्म सुगंध दिवसभर कार्यानुमेय वरील तिन्ही प्रकारे न्यून-अधिक प्रमाणात येतो. काही वेळा सद्गुरु काकांच्या खोलीतील सुगंध खोलीच्या बाहेर ३ मीटरपर्यंत येतो.

६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा संतांप्रती भाव 

अ. जुलै २०२१ मध्ये सद्गुरु काका सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींची भेट घेणार होते. पू. आजी खोलीत येण्यापूर्वी ५ मिनिटे सद्गुरु काका

खोलीत आले. सद्गुरु काकांनी खोलीची स्वच्छता आणि बसण्याची व्यवस्था बघितली. त्यानंतर त्यांनी खोलीत उदबत्ती लावण्यास सांगितली. त्याच वेळी खोलीत असलेल्या एका लाकडी दिवाणावरील गादीची चुरगळलेली खोळ त्यांनी व्यवस्थित केली. पू. दातेआजी खोलीत आल्यावर सद्गुरु काकांनी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला.

आ. एकदा सद्गुरु काकांच्या खोलीत पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज भेटायला येणार होते. त्या वेळी सद्गुरु काकांनी ते येण्याअगोदर मला बोलावून घेतले आणि पुन्हा खोलीचा केर काढण्यास अन् जमीन पुसण्यास सांगितली.

इ. एप्रिल २०२१ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ येणार होत्या. त्या वेळीही सद्गुरु काकांनी संपूर्ण खोलीची स्वच्छता करून घेतली. एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ येणार; म्हणून त्यांनी खोलीतील दिवाणावर नवीन चादर (बेडशीट) घातली.

ई. मे २०२१ मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे हे सद्गुरु गाडगीळकाकांना भेटण्यास त्यांच्या खोलीत येणार होते. त्या वेळीही सद्गुरु गाडगीळकाकांनी खोली स्वच्छता करून घेण्यासह सद्गुरु राजेंद्रदादांच्या बसण्याची व्यवस्था केली.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

सद्गुरु काकांची सेवा करण्याची संधी परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळेच मिळाली. सद्गुरु गाडगीळकाका यांचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयीचे सूक्ष्मातील कार्य अद्वितीय अन् अफाट आहे. या लेखात त्यांच्याविषयी लिहिलेला भाग म्हणजे काही अंशांश असून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामुळे मी तो मांडण्याचा करू शकलो. त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता शब्दांत मांडण्यासाठी लेखणी थिटी (अपुरी) आहे. आज माझ्यासह सनातनच्या सर्व साधकांना उगवणारा प्रत्येक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले, भगवान श्रीकृष्ण, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्यामुळेच दिसत आहे. त्यामुळे या सर्वांच्या कृपेविषयी एका वाक्यात सांगायचे झाल्यास ‘तुझ्या कृपेने दिवस उगवे हा !’, अशी माझी स्थिती आहे.

‘परात्पर गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या कृपेमुळेच ईश्वरप्राप्तीची आंतरिक ओढ आणि गोडी उत्तरोत्तर वाढत असून ती लवकरात लवकर साध्य करावी’, असे अंतरी वाटत आहे. ‘सद्गुरु काकांचे गुण आत्मसात करण्यासह त्यांच्या समष्टी कार्यात आपणही साधना वाढवून त्यांच्याशी लवकरात लवकर एकरूपता साधली जावी’, अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना !’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१.९.२०२१)

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधकांना आलेल्या अनुभूती आणि त्याचे उलगडलेले शास्त्र

वाढदिवसाच्या दिवशी माझ्यात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होणे आणि त्याचे कारण दुसर्‍या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी माझ्या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या चौकटीवरून लक्षात येणे

‘२८.८.२०२२ या दिवशी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी साधकांना माझा तोंडवळा, तोंडवळ्यावरील रंग किंवा माझ्या हालचाली यांच्यात पुढीलप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. माझा वाढदिवस साजरा करायला आलेल्या साधकांना माझ्या हालचाली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारख्या होत असल्याचे जाणवले.

२. काहींना माझे चरण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे जाणवले.

३. एक साधिका परराज्यातून आली होती. त्यामुळे मी तिला ओळखत नव्हतो. ती मला बघून आणि मला नमस्कार करून म्हणाली, ‘‘तुमच्या तोंडवळ्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखी गुलाबी छटा दिसत असल्याने तुमच्यात मला त्यांचेच दर्शन होत आहे.’’ माझा वाढदिवस साजरा करायला आलेल्या काही साधकांनाही ही अनुभूती आली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

४. मी माझी आई सौ. माधुरी माधव गाडगीळ हिला माझी वाढदिवसाच्या दिवशी काढलेली छायाचित्रे दाखवत होतो. तेव्हा ती छायाचित्रातील माझ्याकडे बोट दाखवून म्हणाली, ‘‘हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत का ?’’ तिने हे २ – ३ वेळा विचारले.

५. पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे आणि जन्मतःच संत असलेले बालक) यांनी माझ्यासाठी शुभेच्छापत्र बनवून आणले होते. त्यात त्यांनी माझे छायाचित्र न चिकटवता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र चिकटवले होते. तेव्हा त्यांच्या आई सौ. मानसी यांनी त्यांना विचारले, ‘‘यामध्ये सद्गुरु गाडगीळकाका यांचे छायाचित्र का नाही लावले ?’’ तेव्हा पू. वामन म्हणाले, ‘‘सद्गुरु गाडगीळकाका आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे एकच आहेत !’’

६. सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर या माझ्या खोलीत मला नमस्कार करायला आल्या, तेव्हा मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला बघून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच बसले आहेत’, असे मला जाणवले. तसेच तुम्हाला नमस्कार करतांना तुमच्या जागी मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचेच दर्शन झाले.’’

अनेकांना अशी अनुभूती आली, याचे मला आश्चर्य वाटत होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्या संदर्भात लिहिलेली ‘सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची अद्वितीय क्षमता असणारे एकमेवाद्वितीय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ’ ही चौकट मी वाचली. तेव्हा मला ‘साधकांना माझ्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ.  आठवले यांचे दर्शन का झाले ?’, याचा उलगडा झाला आणि त्यामागील शास्त्र कळले.

या चौकटीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, ‘सूक्ष्मातून होणार्‍या आक्रमणांसाठी करावयाचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय’, ही एक मोठी सेवा सध्या सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ करत आहेत. आजवरच्या गुरु-शिष्यांच्या इतिहासामध्ये शिष्याने गुरूंना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य केल्याचे उदाहरण आढळत नाही. त्यामुळे असे वाटते की, सप्तर्षींनी जसे ‘माझ्या आध्यात्मिक उत्तराधिकारीश्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत’, असे सांगितले आहे, तसे ‘सूक्ष्मातील उपायांचे उत्तराधिकारी सद्गुरु गाडगीळकाका आहेत’, असे सांगतील, असे मला वाटते.’

यावरून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्यांचे तत्त्व प्रदान करून त्यांच्यास्वरूप बनवले’, असे मला वाटले. त्यामुळेच साधकांना माझ्यामध्ये त्यांचे दर्शन झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची माझ्या संदर्भातील चौकट वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘आतापर्यंत माझ्याकडून श्रीगुरूंनी जी समष्टी सेवा करवून घेतली, ती त्यांच्या चरणी समर्पित झाली’, असे मला वाटले. ‘माझा भाग्योदय, तसेच पुनर्जन्म झाला आहे आणि माझ्याकडून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणखी मोठे कार्य करवून घेणार आहेत’, याची मला जाणीव झाली. अध्यात्मातील ही फार मोठी अनुभूती दिल्याबद्दल आणि माझ्या मनुष्यजन्माचे श्रीगुरुचरणी सार्थक होणार असल्याबद्धल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी शिरसाष्टांग नमन करून कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो !’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.८.२०२२)


  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक