साधकांसाठी दिवस-रात्र आध्यात्मिक स्तरावर उपाय करणारे आणि श्री गुरूंची संजीवनी देवता (धन्वन्तरि देवता) असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ (वय ५९ वर्षे) !

काल, २८.८.२०२२ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने…

‘फेब्रुवारी २०२१ पासून मला श्रीकृष्णकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना प्रसाद-महाप्रसाद देण्याची आणि त्यांचे कपडे इस्त्री करण्याची सेवा मिळाली. याच समवेत मधल्या कालावधीत त्यांच्या खोलीची स्वच्छता करणे आणि अन्य काही सेवा करण्याचीही मला संधी मिळाली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णकृपेने माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. गुणवैशिष्ट्ये 

श्री. भूषण कुलकर्णी

१ अ. प्रेमभाव : ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना कधी कुणी काही खाऊ पाठवल्यास ते त्यातील थोडासा खाऊ मला आवर्जून देतात. कधी कधी ते मला आपणहून खाऊ खाण्यास बोलावतात.

१ आ. शिस्तबद्धता : सद्गुरु काकांच्या अनेक गोष्टींमध्ये शिस्तबद्धता असते. ते त्यांचे धुतलेले कपडे इस्त्री केल्याप्रमाणे घडी घालून ठेवतात. त्यामुळे ‘त्यांच्या कपड्यांना इस्त्री केली आहे’, असेच मला वाटते. त्यांच्या खोलीतील अनेक वस्तू जागच्या जागीच ठेवलेल्या असतात. त्यामुळे त्या वस्तू शोधण्यात वेळ जात नाही.

१ इ. चुकांविषयीची संवेदनशीलता : एका साधकाला आध्यात्मिक त्रासामुळे पोटात पुष्कळ दुखत होते. त्यामुळे त्याने पहाटे ४.३० वाजता सद्गुरु काकांना संदेश पाठवला. त्या वेळी सद्गुरु काका झोपलेले होते. सद्गुरु काका पहाटे ५.३० वाजता उठले आणि त्यांनी वैयक्तिक आवरले. सकाळी ६ वाजता त्या साधकाचा त्रास पुष्कळ वाढल्यामुळे त्याने सद्गुरु काकांना भ्रमणभाष केला. त्या वेळी सद्गुरु काकांनी त्यांना नामजपादी उपाय सांगितले आणि त्यांना १५ मिनिटांतच बरे वाटू लागले.

वरील प्रसंग मला सांगतांना सद्गुरु काका म्हणाले, ‘‘त्या साधकाला माझी तातडीने आवश्यकता असतांना मी त्याला साहाय्य करू शकलो नाही. ही माझी मोठी चूक झाली. मला गुरूंनी दिलेल्या दायित्वामध्ये मी न्यून पडलो.’’ हे सांगून झाल्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. त्या वेळी त्यांच्यामध्ये असलेली चुकीविषयीची संवेदनशीलता आणि त्यांना जाणवलेली खंत माझ्या लक्षात आली.

१ ई. सद्गुरु काकांची खाण्याविषयी कोणतीही आवड-नावड नसणे : सद्गुरु काकांची खाण्याविषयी कोणतीही आवड-नावड नाही. त्यांना प्रसाद-महाप्रसादासाठी दिलेल्या पदार्थांमध्ये सर्व पदार्थ ते आवडीने खातात. ‘त्यांना एखादा पदार्थ आवडला; म्हणून त्यांनी तो पदार्थ पुष्कळ घेऊन खाल्ला’, असे नसते.

१ उ. आश्रमातील कार्यपद्धतीचे पालन करणे : सद्गुरु काकांना गोड आवडते. आश्रमात कधी गोड पदार्थ केल्यावर ‘तो पदार्थ किती घ्यावा ?’, याविषयीचे प्रमाण लिहिलेले असते. काही वेळा ते जेवलेले नसतात, तरीही सद्गुरु काका तो पदार्थ दिलेल्या प्रमाणानुसारच मला आणायला सांगतात.

२. शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. अत्यल्प झोप होऊनही दिवस-रात्र साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! : साधकांना आध्यात्मिक त्रास तीव्र स्वरूपात व्हायला लागल्यावर दिवसभरात किमान १०० साधक सद्गुरु गाडगीळकाकांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारतात. ‘कोणत्याही साधकाला आध्यात्मिक किंवा शारीरिक स्तरावरील त्रास असो, सद्गुरु काका त्या साधकांना ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीनुसार नामजप शोधून देतात, तसेच तो नामजप त्या साधकाने किती घंटे करायचा आणि कोणता न्यास करायला हवा’, तेही सांगतात. काही वेळा काही साधकांना शारीरिक त्रास होत असतो. त्या वेळी सद्गुरु काका स्वतः त्या साधकांसाठी घंटोन्घंटे नामजपादी उपाय करतात. साधकांसाठी सद्गुरु काका उपाय करतांना तहान-भूक हरपून जातात. दिवस असो वा रात्र असो, सद्गुरु काकांना काळाचे भान रहात नाही. काही वेळा सद्गुरु गाडगीळकाका रात्री १ वाजता झोपल्यानंतरही साधकांना आध्यात्मिक त्रास झाल्यावर ते साधक त्यांना भ्रमणभाषवर संपर्क करून कळवतात. त्यांना नामजपादी उपाय सांगणे किंवा प्रसंगी त्यांचा त्रास न्यून होईपर्यंत उपाययोजना करणे, यामुळे काही वेळा काकांना झोपायला पहाटे ४ ते ४.३० वाजतात, तरीही सकाळी ६.३० वाजता उठून त्यांचा नित्यक्रम चालू होतो.

२ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर वाईट शक्तींनी आक्रमण केल्याने त्यांची कंबर आणि पाठ दुखणे, तरीही त्यांनी झोपलेल्या स्थितीतही साधकांना नामजपादी उपाय सांगणे : मार्च २०२१ मध्ये सद्गुरु काकांवर वाईट शक्तींनी आक्रमण केल्याने त्यांची कंबर आणि पाठ पुष्कळ दुखत होती. त्या वेळी सद्गुरु काकांना बसतांना आणि वाकतांना पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी वैद्यांनी त्यांना ‘विश्रांती घ्यावी आणि अर्ध्या घंट्यापेक्षा अधिक वेळ बसू नये’, असे सांगितले होते. अशी स्थिती असतांनाही सद्गुरु काकांनी नित्यक्रमाप्रमाणे साधकांना नामजपादी उपाय सांगण्याची सेवा चालूच ठेवली. त्या वेळी त्यांनी स्वतःला बरे वाटत नाही; म्हणून सवलत घेतली नाही. त्याविषयी त्यांनी मला सांगितले, ‘‘आपल्याला श्री गुरूंनी साधकांचे दायित्व दिले आहे, तर आपण कुणालाही ‘नाही’ कसे म्हणायचे ? त्यांना नामजपादी उपाय सांगणे आणि त्यांच्यासाठी ते करणे, हे माझे कर्तव्य आहे.’’ यातून ‘सद्गुरु गाडगीळकाकांनी दायित्व कसे पार पाडले पाहिजे’, याचा परिपाठ मला घालून दिला.

२ इ. साधकांसाठी घंटोन्घंटे बसून नामजपादी उपाय करूनही स्वतःच्या शारीरिक त्रासाविषयी कोणतेही गार्‍हाणे न करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! : ‘साधक किंवा संत यांच्यासाठी नामजपादी उपाय करतांना सद्गुरु काका बराच वेळ मुद्रा वा न्यास करून ध्यानाला बसतात, तर काही वेळा खोलीतल्या खोलीत फेर्‍या मारून हातात माळ घेऊन साधकांसाठी नामजप करतात. ‘आज पुष्कळ वेळ बसून नामजप केला; म्हणून पाठ किंवा कंबर दुखत आहे अथवा नामजपादी उपाय करतांना एकच न्यास पुष्कळ वेळ करावा लागला; म्हणून माझा हात दुखला’, असे गार्‍हाणे सद्गुरु काका कधीही करत नाहीत.

२ ई. पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजींसाठी नामजपादी उपाय करणे आणि तेव्हा ‘पोट चैतन्यामुळे भरले आहे’, असे सद्गुरु मुकुल गाडगीळ यांनी सांगणे : एकदा पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजींचा औषधोपचार करूनही ताप न्यून होत नव्हता. सद्गुरु काकांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी पू. आजींसाठी सकाळी ८ वाजता नामजपादी उपाय चालू केले. मी सकाळी ८.१५ वाजता त्यांना अल्पाहार (न्याहरी) खोलीत नेऊन ठेवला होता. मी अल्पाहाराची रिकामी भांडी घेण्यासाठी सकाळी ९.१५ वाजता खोलीत गेलो असता सद्गुरु काकांनी अल्पाहार ग्रहण केलेला नव्हता. मी त्या वेळी सद्गुरु काकांना अल्पाहार आणि दूध गरम करून आणून देण्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘पू. आजींसाठी नामजपादी उपाय केल्यामुळे चैतन्याने माझे पोट भरले. अल्पाहार परत नेऊन ठेव. मला केवळ दूध गरम करून दे.’’

२ उ. आपत्काळाच्या दृष्टीने आध्यात्मिक त्रासातून लवकर बरे होण्यासाठी सतत नामजपादी उपाय शोधणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! : साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना सद्गुरु काका नामजपादी उपाय शोधून देतात; पण ‘त्या साधकाला होत असलेला त्रास लवकरात लवकर न्यून होऊन त्याला बरे वाटावे’, यासाठी ते आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून काढतात, उदा. साधकांची कुंडलिनीशक्ती जागृत करणे, अग्निहोत्राच्या माध्यमातून शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करणे, विविध शारीरिक आजारांवर देवतांचे नामजप सांगणे, संतांच्या कपड्यांवर सातत्याने वाईट शक्तींकडून आक्रमणे होत असतांना त्यावर आध्यात्मिक स्तरावर करावयाचे उपाय, साधकांवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण लवकर दूर करण्यासाठी ‘निर्विचार’ नामजप भावपूर्ण ऐकणे आदी.

२ ऊ. सूक्ष्मशरीर शास्त्राचा अचूक अभ्यास करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! : सद्गुरु काकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अफाट आहे. ‘एखाद्या साधकाला कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे आणि त्या साधकाला शरिरातील कोणत्या भागात त्रास होत आहे ?’, हे सद्गुरु काका अचूकपणे सांगतात. याविषयीची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

२ ऊ १. बालसाधिकेच्या दुखत असलेल्या भागावर नामजपादी उपाय केल्यावर तिला होणारा त्रास दूर होणे आणि बालसाधिकेच्या वैद्यकीय चाचण्याही सर्वसाधारण येणे : रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एक बालसाधिका खेळत असतांना तोंडावर पडली. त्यामुळे तिला मुका मार लागला. तिला आधुनिक वैद्यांना दाखवले आणि सद्गुरु काकांना तिच्यासाठी नामजपादी उपायही विचारले. तेव्हा सद्गुरु काकांनी त्या बालसाधिकेच्या डोक्याच्या मागच्या बाजूस तळहात ठेवून न्यास करण्यास सांगून नामजपादी उपाय सांगितले. हे उपाय शोधत असतांनाच आधुनिक वैद्यांनी त्या बालसाधिकेला क्ष-किरण तपासणी करण्यास सांगितले. ‘खरेतर ती बालसाधिका चेहर्‍यावर पडलेली असतांना डोक्याच्या मागील बाजूस नामजप कसा येईल ?’, असा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो. त्या बालसाधिकेच्या आईने तिच्यासाठी न्यास करून नामजपादी उपाय केले. त्यानंतर १० मिनिटांनी त्या बालसाधिकेच्या मागील बाजूस टेंगूळ आले. त्या भागावर नामजपादी उपाय केल्यावर तिला होत असलेला त्रास दूर झाला आणि त्या बालसाधिकेच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवालही सर्वसाधारण (नॉर्मल) आले.

२ ऊ २. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधकाचे छातीत दुखण्याचा त्रास थांबणे : एका साधकाच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्या वेळी अन्य एका साधकाने त्याविषयी सद्गुरु काका यांना सांगितले. तेव्हा त्यांनी त्या साधकाचा हृदय स्पंदन आलेख (ई.सी.जी.) काढायला सांगितला. त्याच वेळी सद्गुरु काकांनी ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’तून नामजप शोधला. त्या वेळी सद्गुरु काकांनी साधकासाठी नामजपादी उपाय केल्यावर साधकाचा छातीत दुखायचा त्रास न्यून होऊन  त्यााचा ‘ई.सी.जी.’चा अहवालही सर्वसाधारण आला.

२ ऊ ३. साधकांच्या त्रास निवारणासाठी त्यांच्या सूक्ष्म शरिराशी एकरूप होणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! : सद्गुरु काका त्रास होत असलेल्या साधकासाठी नामजपादी उपाय शोधतांना त्या साधकाच्या सूक्ष्म शरिराशी एकरूप होतात आणि त्या साधकाच्या त्रासाचे आध्यात्मिक स्तरावर अचूक निदान करतात. ते निदान करतांना त्या साधकाला जसा त्रास होत असतो, तशाच प्रकारचा त्रास सद्गुरु काकांना जाणवतो. त्यानुसार ते साधकाला नामजपादी उपाय सांगतात. हे उपाय सांगून झाल्यावर सद्गुरु काकांनी नामजपादी उपाय थांबवल्यावरही त्यांना मोठ्या प्रमाणात ढेकरा येण्याच्या माध्यमातून किंवा अन्य प्रकारे त्या साधकाचा आध्यात्मिक त्रास दूर होतो. याविषयी सद्गुरु काका म्हणाले, ‘‘मी जरी त्या साधकासाठी करत असलेले उपाय थांबवले असले, तरी माझ्या अंतर्मनात त्या साधकाचे नाव आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा विचार चालू असतो. त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात ढेकरा येतात वा अन्य प्रकारे त्या साधकातील त्रासदायक शक्तीचे विघटन होत असते.’’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२१) (क्रमशः)

सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची अद्वितीय क्षमता असणारे एकमेवाद्वितीय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळे सनातनचे कार्य विविधांगांनी वाढत आहे. प्रथम या कार्यामध्ये मी काही सेवा केल्या. त्यानंतर त्या सेवा अनेक साधकांनी शिकून घेतल्या आणि आज ते साधक दायित्व घेऊन त्या सेवा करत आहेत, उदा. अध्यात्मप्रसाराचे कार्य, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके ! याचाच एक भाग म्हणून सप्तर्षींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना माझ्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केले. या दोघी माझी साधकांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याची सेवा उत्तमरित्या करत आहेत. तशीच ‘सूक्ष्मातून होणार्‍या आक्रमणांसाठी करावयाचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय’, ही एक मोठी सेवा सध्या सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ करत आहेत.

साधकांना त्यांच्या त्रासानुसार आवश्यक ते नामजपादि उपाय शोधून सांगणे, त्यांच्यासाठी नामजपादि उपाय करणे यांपासून समष्टीसाठी आवश्यक जप शोधून सांगणे, सत्संग, धर्मसभा यांसारख्या समष्टी कार्यात सूक्ष्मातून निर्माण होणारे अडथळे दूर होण्यासाठी नामजप करणे, या सेवा ते नियमित करत आहेत. त्यांनी विविध आजारांसाठी उपयोगी पडतील, असे विविध देवतांचे नामजपही स्वतः शोधून काढले आहेत आणि अनेक साधकांना त्यांचा लाभ होत आहे.

त्यांनी कोरोना महामारीवरही नामजप शोधून दिला. त्याचा अनेकांना लाभ झाला. समाजातील लोकांनाही या नामजपाचा परिणाम जाणवून ध्वनीमुद्रित केलेला हा नामजप कोरोनाच्या संदर्भातील अनेक रुग्णालयांमध्ये लावला जात होता. या महामारीच्या कालावधीत आध्यात्मिक स्तरावरील लढ्यात त्यांनी प्रतिदिन अनेक साधकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार नामजपादी उपाय शोधून सांगितले. या नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांनी अनेक साधकांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. सद्गुरु काकांनी नामजपादि उपाय सांगितल्यावर किंवा त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर परिणाम झाला नाही, असे कधीच होत नाही. हा अनुभव आजवर अनेक साधकांनी घेतला आहे.

गेल्या काही काळापासून माझा महामृत्यूयोग चालू आहे. त्यामुळे माझ्यावर सतत वाईट शक्तींची सूक्ष्मातून तीव्र आक्रमणे होत आहेत. या आक्रमणांमुळे काही काळापूर्वी माझी कोणतीही वस्तू इतर साधकांनी हातात धरली, तर त्यांना ‘डोके जड होणे, श्वास थांबणे’, यांसारखे त्रास जाणवत होते. माझ्या नियमित वापरातील वस्तूंचे यु.ए.एस्.द्वारे संशोधन केल्यावरही त्या वस्तूंवर १० ते १५ मीटरपर्यंत नकारात्मक उर्जेचे आवरण येत होते. माझ्या अशा तीव्र नकारात्मक झालेल्या वस्तूंवर सद्गुरु काकांनी काही काळ उपाय केल्यावर त्या लगेच सकारात्मक होत होत्या.

सूक्ष्मातून होणार्‍या तीव्र आक्रमणांमुळे मला ग्लानी येणे, प्राणशक्ती अल्प होणे, यांसारखे त्रास वारंवार होत आहेत. माझ्या अशा स्थितीमध्ये सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांनी अनेकदा माझ्यावर उपाय करून या वाईट शक्तींच्या आक्रमणाची परिणामकारकता अल्प केली आहे. ते माझी प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा यांना नारळाने दृष्ट काढतात. ते दृष्ट काढत असतांना माझ्या सभोवती फिरत असतांना त्यांची स्पंदने मला जाणवतात. इतकी त्यांच्यामध्ये शक्ती आहे.

आजवरच्या गुरु-शिष्यांच्या इतिहासामध्ये शिष्याने गुरूंना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य केल्याचे उदाहरण आढळत नाही. त्यामुळे असे वाटते की, सप्तर्षींनी जसे माझ्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत, असे सांगितले आहे, तसे ‘सूक्ष्मातील उपायांचे उत्तराधिकारी सद्गुरु गाडगीळकाका आहेत’, असे सांगतील, असे मला वाटते. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा येथे व्यक्त करतो !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.८.२०२२)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  https://sanatanprabhat.org/marathi/608743.html


  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक