राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले ! – गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद

नवी देहली – राहुल गांधी यांच्यामध्ये राजकीय कौशल्य नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. काही दिवसांपूर्वीच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. ‘श्रेष्ठींच्या पुढे-मागे करणार्‍यांना किंवा ट्वीट करणार्‍या लोकांनाच पक्षात पद मिळते’, असे काँग्रेस सोडण्यामागील कारण त्यांनी सांगितले.

आझाद यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. ‘मोदी यांनी विवाह केला नाही, त्यांना मुले नाहीत. मी त्यांना क्रूर समजत होतो; परंतु त्यांनी माणुसकी दाखवली’, असे आझाद यांनी नमूद केले. वर्ष २००४ नंतर राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची काँग्रेसची पद्धत संपुष्टात आली. सोनिया गांधी यांचे राहुल गांधी यांच्यावरील अवलंबत्व वाढले. राहुल गांधी यांच्याकडे कोणतेही राजकीय कौशल्य नाही, असेही ते म्हणाले.