नोंद
२९ ऑगस्टला भारतीय हॉकीचे ‘जादुगार’ मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन झाला. हाच दिवस आपण ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ म्हणून साजरा करतो. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ ! मेजर ध्यानचंद यांनी वर्ष १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग ३ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करत तिन्ही वेळेस भारताला ‘सुवर्ण पदक’ मिळवून दिले. वर्ष १९३६ मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने जर्मन हुकूमशहा एडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाचा ८-१ ने पराभव केला होता. स्वातंत्र्यानंतर मात्र प्राधान्यक्रम हॉकीकडून अन्य खेळांकडे संक्रमित झाले.
महाराष्ट्राचे विद्यमान क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अतिशय स्तुत्य निर्णय घेतले. प्रत्येक तालुक्यात एका सुसज्ज असे क्रीडासंकुल उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली, तसेच जेथे यापूर्वी उभारलेली क्रीडासंकुले अपूर्णावस्थेत आहेत, तीही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत पदक प्राप्त करणार्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. दहीहंडीचा साहसी खेळात समावेश करण्यात आला. भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक असलेल्या कबड्डी, खो-खो, मातीतील कुस्ती, मल्लखांब, आट्यापाट्या या ५ देशी खेळांचा विदेशी प्रसार-प्रचार नियमितपणे करण्याची शासकीय योजना आहे.
देशी खेळांचा विदेशी स्तरावर प्रचार करणे स्तुत्य असले, तरी सध्या मुलांना मैदानामध्ये जाऊन खेळण्यासाठीचे प्रयत्नच अधिक करावे लागणार आहेत. शाळांमधूनही मुलांच्या खेळण्याच्या वयात अभ्यासाचे ओझे अधिक देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सध्या मुलांना मैदानामध्ये खेळण्यासाठी कसे प्रवृत्त केले जाईल आणि त्यासाठी क्रीडासंकुले निर्माण करणे, तसेच घरांतूनही पालकांनी मुलांना खेळाकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये खेळण्यातून अनेक गुणांचा विकास होतो. खेळतांना जय-पराजय असतोच. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना जय-पराजयाची सवय लागते. त्यामुळे सरकारने प्रत्येक मुलाने मैदानी खेळ खेळायला हवेत, याकडे लक्ष द्यावे,हीच अपेक्षा !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव