पाकमध्ये पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी पोचलेल्या सैनिकांना लोकांची धक्काबुक्की  

पाकच्या सैनिकांना लोकांची धक्काबुक्की

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या अनेक भागांत पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊन लाखो लोक बेघर झाले आहेत, तर शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या साहाय्यासाठी पाक सैन्याला पाठवण्यात आले आहे; मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून सैनिकांचा विरोध केला जात आहे. त्यांना धक्काबुक्की केली जात आहे.

सिंध प्रांतात जेव्हा पाकिस्तानी सैन्य पूरग्रस्तांच्या साहाय्यसाठी पोचले, तेव्हा तेथील लोकांनी सैनिकांना धक्काबुक्की करून हुसकावून लावले. लोकांनी सांगितले की, हे लोक साहाय्यासाठी नाही, तर छायाचित्रे काढण्यासाठी आले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. सध्या पाकमध्ये पूरस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

हा व्हिडिओ ‘जेई सिंध मुत्तहिदा महज’ या सिंध राजकीय पक्षाचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष शफी महंमद बर्फत यांनी ‘शेअर’ केला आहे. या व्हिडिओमध्ये लोक ‘फौज को मारो’ असे ओरडतांना दिसत आहेत. काही लोक सैनिकांशी झटापट करतांना दिसत आहेत. शफी महंमद यांनी ट्वीट करून म्हटले, ‘सिंधमधील सैनिक पूरग्रस्तांना साहाय्य करण्याच्या नावाखाली नाटक करण्याचा प्रयत्न करेल, छायाचित्रे काढेल आणि सैन्य सिंधी राष्ट्राला साहाय्य करत असल्याचा प्रसारमाध्यमांमध्ये आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. जिथे जिथे सैन्य असे नाटक करायला येते तिथे सिंधचे लोक त्यांना चोख प्रत्युत्तर देतात.’