मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभागसंख्या २२७ वरून २३६ वाढवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता; कारण प्रभाग पुनर्रचना करतांना ती वर्ष २०११ च्या जनगणनेवर करण्यात आली होती. त्यामुळे वाढवलेल्या प्रभागांमध्ये नेमकी किती लोकसंख्या आहे ?, याची निश्चित माहिती नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय पालटून मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या पुन्हा २२७ करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत सांगितले.
मुंबई महापालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यांत आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक क्रमांक १९ विधान परिषदेत मांडण्यात आले, त्या वेळी आमदार भाई जगताप यांनी या विधेयकाला विरोध केला. जगताप म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडी सरकारचा भाग होतो. तरीही आम्ही या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. आमचा आक्षेप प्रभाग २३६ करण्याला नाही, तर प्रभाग पुनर्रचना ज्याप्रकारे केली आहे, त्याला आहे.
प्रभाग पुनर्रचना अशास्त्रीय !
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील सरकारने प्रभाग पुनर्रचना अशास्त्रीय पद्धतीने केली होती, कारण वर्ष २०२१ मध्ये जनगणना झाली नाही. वर्ष २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे अंदाजे प्रभाग वाढवण्यात आले होते. पुढील वर्षी जनगणना होईल, त्यानंतर सरकार स्वतः निवडणूक आयोगाला प्रभाग पुनर्रचना करण्याविषयी पत्र देईल. या वेळी हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत झाले.