हिंदु युवतींचे फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – आमदार नीतेश राणे, भाजप

भाजपचे आमदार नीतेश राणे

मुंबई – महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात अल्पवयीन हिंदु युवतींची फसवणूक करून त्यांचे धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी धर्मांधांना आर्थिक साहाय्य केले जाते. मोटारसायकलची सोय केली जाते. यासाठी हिंदु युवतींचे दरपत्रक (रेटकार्ड) निश्‍चित करण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बळजोरीने  किंवा आमीष दाखवून कुणाचेही धर्मांतर केले जाऊ शकत नाही. या विरोधात कारवाई करण्यासाठी कायदे अधिक कडक केले जातील, तसेच आवश्यकता असल्यास नवीन कायदा केला जाईल’, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.

१. वर्ष २०१९ मध्ये नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील इयत्ता ७ वीमध्ये शिकणार्‍या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण करून इम्रान कुरेशी या धर्मांधाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलीशी निकाह करून तिचे बळजोरीने धर्मांतर केले. त्यानंतर ३ वर्षे या मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी तक्रार करूनही स्थानिक पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आरोपीवर कारवाई केली नाही.

२. अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण महाराष्ट्रात वाढत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून राणे यांनी धर्मांतरबंदी कायदा करण्याची, तसेच आरोपीला पाठीशी घालणार्‍या पोलीस निरीक्षक संजय सानप यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली. ‘कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा शासन करणार का ?’ अशी विचारणा या वेळी राणे यांनी केली. या वेळी नीतेश राणे म्हणाले, ‘‘श्रीरामपूर येथील घटनेत पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे आरोपीशी आर्थिक संबंध असल्याचे म्हटले जात आहे. आरोपीला घरचे जेवण दिले जात होते. या प्रकरणात आरोपीला साहाय्य करणार्‍या पोलिसांवर कडक कारवाई करावी, म्हणजे भविष्यात अशा गुन्हेगारांना साहाय्य करण्याचे धारिष्ट्य कुणी करू नये.’’

हिंदु युवतींना फसवण्यासाठीचे दर सभागृहात केले सादर !

‘हिंदु युवतींना फसवण्यासाठी दरपत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. यामध्ये शीख मुलीला फसवण्यासाठी ७ लाख रुपये, पंजाबी किंवा हिंदु युवती १० लाख रुपये, गुजराथी ब्राह्मण युवती ६ लाख रुपये, क्षत्रिय मुलीला फसवण्यासाठी साडेचार लाख रुपये असे दरपत्रक ठरवण्यात आले आहे. या मुलींची फसवणूक त्यांची विक्री करून त्यांना गायब केले जाते. या हिंदु युवतींचे धर्मांतर करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाते’, असे नीतेश राणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

चर्चच्या माध्यमांतून होणारे धर्मांतर रोखण्याकडे बारकाईने लक्ष घालावे !

‘पास्टर, कॅथलिक चर्च यांद्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. याकडेही बारकाईने लक्ष घातले पाहिजे. चर्चद्वारे राज्यात किती प्रमाणात धर्मांतर झाले आहे ? श्रीरामपूरप्रमाणे पोलीस विभागातील काही लोक धर्मांतरासाठी साहाय्य करत असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली.

हिंदु मुलीचा विवाह लावणारे मौलवी आणि मशिदीचे ट्रस्टी यांच्यावरही कारवाई व्हावी ! – आमदार सुनील कांबळे, भाजप

मी स्वत: पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. श्रीरामपूर येथील ही एकच घटना नाही. मागील ६ मासांत श्रीरामपूर येथील १८ हिंदु युवतींचे धर्मांतर झाले आहे. श्रीरामपूर येथे हिंदु युवतीचा विवाह ज्या मशिदीमध्ये लावण्यात आला, त्या मशिदीचे ट्रस्टी आणि मौलवी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

वचक बसेल, अशी कारवाई व्हायला हवी ! – अजित पवार, विरोधी पक्षनेता, विधानसभा

पोलीसच असे वागले, तर न्याय कुणाकडे मागावा ? समाजाला पोलिसांविषयी आदर कसा वाटेल ? आरोपीवर ७ गुन्हे नोंद आहेत. अशा प्रकरणी मोक्काही लावता येईल. पोलीस निरीक्षक सानप यांना निलंबित करण्यात आले आहे; परंतु निलंबनाची कारवाई झालेले पोलीस समाजात पोलीस असल्याप्रमाणेच वागतात. निलंबनाच्या काळातही त्यांना निम्मे वेतन मिळते. त्यामुळे अशा प्रकरणात पोलिसांना बडतर्फ करावे किंवा वचक बसेल, अशी कठोर कारवाई करावी.

संपादकीय भूमिका

बळजोरीने किंवा आमीष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आवश्यक असल्यास नवीन कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा !