‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण वाढत असल्याने केंद्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

नवी देहली – देशात केरळनंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये ‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. या आजाराचे रुग्ण वाढू लागल्यानंतर केंद्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत.

जर एखाद्याला हा आजार झाला असेल, तर सर्वप्रथम त्याला ५ ते ७ दिवसांसाठी अलगीकरणात ठेवावे. त्या व्यक्तीच्या संपर्कात कुणी येणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णाने पूर्ण विश्रांती घ्यावी आणि भरपूर द्रव पदार्थ घ्यावेत. कोमट पाण्याने त्वचेवर स्पंज लावल्याने त्वचेतील जळजळ अल्प होते. मुलांना शक्यतो रुमाल वापरावा; कारण त्यांची त्वचा अधिक नाजूक असते. त्यामुळे इजा होऊ नये, यासाठी ही काळजी घ्यावी. शरिराच्या ज्या भागावर फोड पडलेले आहेत त्या भागावर खाजवू नये. मुलांचे कपडे चांगले धुणे आणि या काळात त्यांनी पौष्टिक आहार घ्यावा.

‘टोमॅटो फ्लू’ काय आहे ?

‘टोमॅटो फ्लू’ झालेल्या रुग्णांमध्ये शरीर जड होणे, सांधेदुखी, ताप, उलट्या, त्वचेची जळजळ ही सामान्य लक्षणे आहेत. लहान मुलांच्या अंगावर लाल रंगाचे फोड येतात हळूहळू हे फोड वाढत जातात. साधारण ते टोमॅटोच्या आकारासारखे होतात म्हणून याला ‘टोमॅटो फ्लू’ म्हणतात. हा आजार १० वर्षांपेक्षा अल्पवयाच्या मुलांमध्ये होत असला, तरी याचा धोका मोठ्यांनाही आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका आहे. तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अल्प आहे, त्यांनाही या आजाराचा धोका अधिक आहे.