संभाजीनगर येथे येशूचा भक्त असल्याचे सांगून आजार दूर करण्याचा दावा करणार्‍या बाबासाहेब शिंदे यांच्या विरोधात पोलिसांकडून चौकशी चालू !

संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारूंडी गावात येशूचा भक्त असल्याचे सांगून डोक्यावर हात ठेवून उपचार करण्याचा दावा करणारे बाबासाहेब शिंदे या भोंदूचा भांडाफोड झाल्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी चालू झाली आहे. संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे आता खोटी आश्वासने देऊन गरिबांची फसवणूक करणार्‍या या भोंदूवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पैठण येथील आमदार संदीपान भुमरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. अन्य राजकीय पक्षांनीही या प्रकरणी संबंधित दोषींवर लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पारूंडी गावात गेल्या २ वर्षांपासून बाबासाहेब शिंदे रहात असून ते स्वत: ‘मी येशूचा भक्त असून केवळ डोक्यावर हात फिरवून दुर्धर आजार बरे करतो, तसेच येशूच्या आशीर्वादानेच आरोग्य सेवा देत आहे’, असा दावाही करतात. ‘आधुनिक वैद्य रुग्णांना झालेल्या मधुमेह आणि कर्करोग यांवर उपचार करू शकले नाहीत, त्यांच्यावर आपण उपचार करून त्यांना बरे केले आहे’, असा दावा ते करत होते. त्यांच्या याच दाव्यांना बळी पडून संभाजीनगरसह बीड, जालना आणि इतर जिल्ह्यांतील सहस्रो लोक उपचारासाठी त्यांच्या दरबारात येत असल्याचे पहायला मिळत आहे.

याविषयी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित भोंदू ‘जेव्हापासून येशूला प्रार्थना केली, येशूने त्यांची गाठ दूर केली, येशूला धन्यवाद द्या’, ‘सर्व समस्या येशूने दूर केल्या, येशूला धन्यवाद द्या’, ‘एड्स बरा होतो, कॅन्सर बरा होतो. येशूमुळे दूर होते समस्या’, ‘तुम्हाला कोणताही आजार असेल, तर येशू दूर करील’, असे सांगतांना दिसत आहे.

‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने बाबासाहेब शिंदे यांना या दाव्यांविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, मी येशूचा भक्त आहे. मी हात ठेवल्याने कुणी बरा झाला, असा कुठलाही दावा करत नाही. (‘येशूमुळे सर्व आजार दूर होणार’, असे सांगायचे आणि वृत्तवाहिनीसमोर मात्र भूमिका बदलायची यातून खिस्ती प्रचारकाची भोंदूगिरी उघड होते. – संपादक)

संपादकीय भुमिका

येशूचा भक्त असल्याचे सांगून हिंदूंना आजारातून बरे करण्याचा दावा करणे, हा ढोंगीपणा आहे. यातून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात येते, हे उघड आहे. ख्रिस्ती मिशनरी अशीच कूटनीती वापरून हिंदूंचे धर्मांतर करतात. त्यामुळे अशा भोंदूंवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे ? हे यातून लक्षात येते.