मालेगाव बाँबस्फोट प्रकरण
मुंबई – लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश असलेल्या वर्ष २००८ च्या मालेगाव बॉँबस्फोट प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची सुनावणी करण्यापासून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी १९ ऑगस्ट या दिवशी माघार घेतली आहे. या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी खटल्याच्या प्रगती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
या प्रकरणातील एका सहआरोपीने निदर्शनास आणून दिले की, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे वर्ष २०११ मध्ये फिर्यादीसाठी उपस्थित झाल्या होत्या. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा ‘एन्.आय.ए’च्या अधिवक्त्यांनी ‘या प्रकरणाची सुनावणी चालू ठेवल्यास आमची हरकत नाही’, असे म्हटले होते. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी यापूर्वी याच आरोपीच्या याचिकेवर खटला लवकर चालवण्याचे आदेश दिले होते; मात्र गेल्या सुनावणीच्या वेळी आरोपींना दिलासा देण्यास न्यायाधिशांनी अनास्था दाखवली होती.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि व्ही.जी. बिश्त यांच्या खंडपिठाने ‘एन्.आय.ए’ला प्रत्येक सुनावणीसाठी किमान २ साक्षीदार उपस्थित ठेवण्यास सांगितले. उपस्थित न रहाणार्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याची सूचना मागील सुनावणीच्या वेळी केली होती, तसेच न्यायालयाने ‘एन्.आय.ए’ला १ ऑगस्ट या दिवशी मागील संपूर्ण मासातील खटल्यातील नोंदवही किंवा रोजनामा दिवसाच्या कार्यवाहीची नोंद सादर करण्याचे निर्देश दिले होते.