आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘यू ट्यूब’ वाहिनी सर्वाधिक लोकप्रिय झालेली आहे. ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून घरबसल्या कोणत्याही स्वरूपाची माहिती दृश्य स्वरूपात मिळते. ‘यू ट्यूब’ पहाणे म्हणजे एका मुठीत विश्व सामावण्यासारखेच आहे; पण याच ‘यू ट्यूब’चा सध्या अपवापर केला जातो, हे खेदजनक आहे. खोटी वृत्ते देणार्या ८ ‘यू ट्यूब’ वाहिन्यांवर नुकतीच केंद्रशासनाने बंदी घातली आहे. या वाहिन्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करत होत्या. भारतीय सुरक्षा दले आणि जम्मू-काश्मीर यांच्याविषयीचीही खोटी वृत्ते यांवरून दाखवली जात. लोकांपर्यंत चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी या वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ‘लोकतंत्र टीव्ही’, ‘यू अँड वी टीव्ही’, ‘ए.एम्. रजवी’, ‘गौरवशाली पवन मिथिलांचल’, ‘सीटॉप ५ टी.एच्.’, ‘सरकार अपडेट’ आणि ‘सब कुछ देखो’ या ७ भारतीय वाहिन्यांचा, तर पाकिस्तानमधील ‘न्यूज की दुनिया’ या वाहिनीचा समावेश आहे. भारतातीलच वाहिन्यांनी भारताचा द्वेष करणे, यावरून हे विषवल्लीचे मूळ कुठपर्यंत गेले आहे, ते लक्षात येते. बंदी आणलेल्या वाहिन्यांचे ११ कोटींहून अधिक दर्शक असून ८५ लाख ७३ सहस्र ‘सबस्क्रायबर्स’ आहेत. या वाहिन्यांची दर्शकसंख्या पहाता त्यांना किती मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होत असेल, याची कल्पना करता येईल; या आर्थिक लाभाचा वापर देशविरोधी कारणांसाठीच केला जात असेल, तर तोही देशद्रोहच आहे. त्यामुळे केंद्रशासनाने वेळीच बंदीचा निर्णय घेतला, हे योग्य झाले. या वाहिन्यांच्या माध्यमातून दाखवली जाणारी दृश्ये धार्मिक तेढ निर्माण करणारीही होती. ‘भारत सरकारने धार्मिक वास्तू पाडल्या, अमुक धार्मिक उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली, तसेच भारतात धर्मयुद्ध घोषित झाले’, अशा स्वरूपाची वृत्ते या वाहिन्यांवरून प्रसिद्ध व्हायची. असे वारंवार होऊ लागल्यास देशातील धार्मिक सहिष्णुता आणि सार्वजनिक शांतता धोक्यात येऊ शकते. वरील प्रत्येक विषय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या वाहिन्यांचे दर्शक जर विदेशी लोक असतील, तर यातून भारताच्या मैत्रीपूर्ण परराष्ट्र संबंधांमध्येही बाधा निर्माण होऊ शकते. असे झाल्यास त्याचा भारताच्या सर्वांगीण प्रगतीवर दुष्परिणाम होईल. या माध्यमातून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा वाहिन्यांवर बंदी घालण्या समवेत द्वेषमूलक वृत्ते दाखवणार्यांच्या मूळ स्रोतांवरही कारवाई करणे आवश्यक आहे.
वचक निर्माण करा !
भारत शासनाने काही मासांपूर्वी देशविरोधी अपप्रचार करणार्या ९४ ‘यू ट्यूब’ वाहिन्या, १९ सामाजिक संकेतस्थळे, २ ‘इन्स्टाग्राम’ खाती, २ ट्विटर खाती, २ फेसबूक खाती यांच्यावरही बंदी घातली होती. आता १ पाकिस्तानी वाहिनी बंद केली; पण नंतर आणखी पाकिस्तानी वाहिन्यांनी यात शिरकाव केल्यास आपण किती जणांना आळा घालत बसणार आहोत ? एखादी वाहिनी किंवा खाते यांवर बंदी घातली की, पुन्हा काही दिवसांतच नवीन वाहिनी किंवा खाते यांची निर्मिती होऊन त्यांवरून विद्वेषी प्रचार चालू होतो. त्यामुळे वाहिन्या किंवा संकेतस्थळे यांवर बंदी घालण्याची फलनिष्पत्ती शून्यावरच येते आणि भारतविरोधाचे हे चक्र अखंड चालूच रहाते. ते कुठेतरी थांबायला हवे. त्यासाठी केवळ बंदीचा मार्ग पूरक ठरणार नाही. सामाजिक संकेतस्थळे किंवा यू ट्यूब यांच्या माध्यमातून फुटीरतावादी विचारसरणीला खतपाणी घातले जात आहे. ही विचारसरणी नष्ट करायला हवी. सर्वत्र गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बलात्कार, हत्या, दंगल यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. याचे मूळ ही विचारसरणी आहे. खरेतर भारताविरुद्ध गरळओक करण्याचे कुणाचेही धाडस व्हायला नको, अशा स्वरूपाचा वचक सरकारने संपूर्ण जगभरात निर्माण केला पाहिजे. त्यासाठी असे कृत्य करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी लागेल. सौदी अरेबियातील पी.एच्.डी.ची विद्यार्थिनी असणार्या एका महिलेने तेथील सरकारविरोधी ट्वीट केले. या प्रकारावरून तिला तेथील न्यायालयाने ३४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तिने अफवा पसरवल्या असून राष्ट्रविरोधी कृत्य केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. सौदी अरेबियाच असे नव्हे, तर अन्य अनेक देशांमध्ये शिक्षेची तरतूद ही कठोर असून तिची कार्यवाहीही त्वरित केली जाते. जे अन्य देशांना जमते, ते भारताला का जमत नाही ? याचा सरकारने विचार करावा.
दर्शकांचे कर्तव्य !
संकेतस्थळे असोत किंवा यू ट्यूब वाहिनी असो, त्यांच्या माध्यमातून जोडल्या जाणार्या कोट्यवधी दर्शकांचे दायित्व काय आहे ? या कोट्यवधींमध्ये भारतियांचाही काही प्रमाणात समावेश असेलच ! मग या दर्शकांना आपल्या राष्ट्राविषयी प्रेम किंवा आदर नाही का ? ‘व्हिडिओद्वारे निर्माण होणारी द्वेषमूलक मानसिकता झुगारून द्यायला हवी’, असे त्यांना का वाटत नाही ? सरकार दायित्व म्हणून बंदी घालतच आहे; पण ‘दर्शक’ या नात्याने अशा प्रचाराला विरोध करण्याचे कुणाचेच धारिष्ट्य का बरे होत नाही ? ‘एक नागरिक म्हणून अशा लिखाणाच्या किंवा व्हिडिओंच्या विरोधात आपणही आवाज उठवावा’, असा विचार मनात न येण्याला कोणती मानसिकता कारणीभूत आहे ?’, यांसारखे अनेक प्रश्न समोर येतात. अशी मनोवृत्ती निर्माण होण्यास नागरिकांमधील राष्ट्रप्रेमाचा अभावच कारणीभूत आहे. यामुळेच तर फुटीरतावादी हे राष्ट्र आणि धर्म विरोधी दृश्यांतून स्वतःचा डाव साधत आहेत. प्रखर राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रवाद हे शब्द तर केवळ नावालाच उरलेले आहेत. त्यातील जाणीव रुजवणे आणि ती वृद्धींगत करणे, हे कुठल्याच स्तरावर होत नाही. भारताच्या विरोधात एकाने गरळओक केली, तरी कोट्यवधींनी संघटित होऊन तो आवाज दडपला पाहिजे. जेव्हा हे साध्य होईल, तेव्हा कुणीही भारतविरोधी पाऊल उचलतांना १०० वेळा विचार करील. यासाठी नागरिक आणि सरकार दोघांनीही राष्ट्रकर्तव्याचे भान ठेवून कृतीशील व्हावे !
केवळ द्वेषमूलक वृत्ते दाखवणार्यांवर नव्हे, तर द्वेषाचे बीज पेरणार्यांवरही कारवाई करा ! |