भारत-पाक अणुयुद्धात २०० कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो ! – शास्त्रज्ञांचा दावा

नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये ७ मासांपासून युद्ध चालू आहे. चीन आणि तैवान यांच्यामध्ये युद्धाची शक्यता कायम आहे. या दोन्ही संकटांनी संपूर्ण जगाला दोन गटात विभागले आहे. अशा स्थितीत अनेक वेळा ‘महायुद्धाला आरंभ होईल’, अशी परिस्थिती निर्माण होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अणूयुद्धाचा धोका कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर रटगर्स विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. ‘भारत-पाक अणूयुद्ध झाल्यास २०० कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो’, असे या अभ्यासातील आकडेवारी दर्शवते.

१. या अभ्यासानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध एका सप्ताहापेक्षा अल्प काळ टिकू शकते आणि यामध्ये थेट आक्रमणानंतर ५ ते १२.५ कोटी लोक मारले जाऊ शकतात.

२. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणूयुद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम होऊ शकतो. याचा जगभरातील अन्न पुरवठ्यावर अतिशय घातक परिणाम होऊ शकतो आणि जगभरात उपासमारीने मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकतो.

३. भारत-पाक अणूयुद्धानंतर ३ ते ४ वर्षांनी जागतिक अन्न, प्राणी आणि मत्स्य उत्पादनात ९० टक्के घट होऊ शकते.

४. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही अशी चेतावणी दिली आहे की, एकेकाळी अकल्पनीय असलेल्या अण्वस्र संघर्षाची शक्यता आता पुन्हा शक्यतेच्या कक्षेत आली आहे.