सावंतवाडी – कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची त्यांच्या शहरातील ‘श्रीधर अपार्टमेंट’ या निवासस्थानी भेट घेण्यात आली. मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे परिषदेच्या वतीने मंत्री केसरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी मंत्री केसरकर यांना ‘मराठी भाषा टिकण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषतः कोकणात विविध योजना आणि उपक्रम राबवावेत’, या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी मंत्री केसरकर यांनी, ‘मातृभाषा मराठी टिकवण्यासाठी, तिचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी निश्चितपणे विशेष लक्ष घातले जाईल’, असे आश्वासन दिले.
या वेळी परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अधिवक्ता संतोष सावंत, तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, जिल्हा प्रतिनिधी प्रा. सुभाष गोवेकर आदी उपस्थित होते.