गोवा : जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.वर बंदी घाला !

डिचोली येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी

डिचोली, १३ ऑगस्ट – देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ, जुने बसस्थानक, डिचोली येथे आयोजित हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात सहभागी राष्ट्र आणि धर्मप्रेमी

देशव्यापी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाचा हा एक भाग आहे. या आंदोलनात राष्ट्रीय बजरंग दल, भारत माता की जय, हिंदु राष्ट्र संघटना-डिचोली, हिंदु रक्षा महाआघाडी, वीर सावरकर युवा मंच, गोमंतक मंदिर महासंघ, ‘एक दिवस भारतमातेसाठी’, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटना, तसेच श्री गोपाळकृष्ण देवस्थान समिती, शिरसई आदींच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

शंखनाद केल्यानंतर निदर्शनाला प्रारंभ झाला. हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाच्या वतीने निदर्शनांचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनांतून पुढील सूर उमटला.

१. नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले किंवा एखादी धार्मिक टिप्पणी केली की, सध्या वादाचे निमित्त करून देशभरात एकामागोमाग हिंदूंना वेचून ठार मारले जात आहे. आम्ही कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या भडकाऊ विधानांचे समर्थन करत नाही. जे भडकाऊ विधान झाले आहे, त्यावर पोलीस कारवाई करतील.

२. असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणून देशात गृहयुद्ध पेटवण्याचे हे एक मोठे षड्यंत्र आहे. ‘सर तन से जुदा’ या मोहिमेचा छडा लावून ही मोहीम कोण राबवत आहे ? त्याला अर्थसाहाय्य कोण करत आहे ? कोण अशा जिहाद्यांची माथी भडकवत आहे ? याचा छडा लावावा. या षड्यंत्रात सहभागी असणार्‍यांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए अंतर्गत) गुन्हे नोंदवण्यात यावेत.

३. अशा प्रकारच्या अनेक हत्यांमध्ये, तसेच अनेक देशविरोधी कारवायांत पी.एफ्.आय., एस्.डी.पी.आय. आणि संलग्न इस्लामी संघटना यांच्यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी. हिंदूंच्या या हत्यांची सर्व प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात यावीत.

४. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी मदरशांवर कारवाई करत ते त्वरित बंद करण्यात यावेत.

आंदोलनाला गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. विनायक च्यारी, कीर्तनकार किरण तुळपुळे आणि सनातन संस्थेच्या सौ. साधना जोशी यांनी संबोधित केले. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी ठराव मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल वझे आणि सौ. सोनम शिरोडकर यांनी केले.