जिहादी आतंकवादी बिट्टा कराटे याच्या पत्नीसह ४ जण काश्मीरच्या सरकारी नोकरीतून बडतर्फ

जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचा आरोप

जिहादी आतंकवादी बिट्टा कराटे (डावीकडे) पत्नी अर्जुमंद खान (उजवीकडे)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवादी फारूक अहमद डार उपाख्य बिट्टा कराटे याची पत्नी अर्जुमंद खान हिला सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. ती काश्मीर प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण विकास विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होती. ती ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या आतंकवादी संघटनेला साहाय्य करत होती, असा तिच्यावर आरोप आहे. यासह जिहादी आतंकवादी आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याचा मुलगा सय्यद अब्दुल मुईद यालाही बडतर्फ करण्यात आले आहे. तो जम्मू-कश्मीर उद्योग विकास विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्यांच्या व्यतिरिक्त काश्मीर विश्‍वविद्यालयात कार्यरत वैज्ञानिक मुहीद अहमद भट आणि साहाय्यक प्राध्यापक माजिद हुसेन कादरी यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. या सर्वांवर राज्यघटनेच्या कलम ३११ अनुसार कारवाई करण्यात आली आहे. बिट्टा कराटे याने वर्ष १९९० मध्ये २० हून अधिक काश्मिरी हिंदूंची हत्या केली होती.

संपादकीय भूमिका

  • अशांना नुसते बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकावे ! बाहेर राहून ते आतंकवाद्यांना साहाय्य करतच रहातील !
  • आतंकवाद्यांचे समर्थक म्हणून ४ जण इतकी वर्षे सरकारी नोकरीत असतांना गुप्तचर यंत्रणांना त्यांचा थांगपत्ता कसा लागला नाही ?