चामराज पेटे मैदान ही जमीर अहमद खान यांच्या वडिलांची संपत्ती आहे का ?

  • भाजपचे आमदार सी.टी. रवि यांचा संताप

  • बेंगळुरू येथील चामराज पेटे मैदानात गणेशोत्सव साजरा करण्याला काँग्रेसचे स्थानिक आमदार जमीर अहमद खान यांनी विरोध केल्याचे प्रकरण

बेंगळुरू येथील चामराज पेटे मैदान

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील चामराज पेटे मैदान ही काँग्रेसचे आमदार जमीर अहमद खान यांच्या वडिलांची संपत्ती आहे का ? ‘गणेशोत्सवाला अनुमती देणार नाही’, असे म्हणण्याचा जमीर यांना कुणी अधिकार दिला ? असे प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार सी.टी. रवि यांनी उपस्थित केले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार सी.टी. रवि

हे मैदान अनेक वर्षांपासून ‘ईदगाह मैदान’ म्हणून मुसलमानांकडून वापरण्यात येत होते. येथे हिंदूंना कोणताही सण साजरा करण्याची अनुमती नव्हती; मात्र राज्याच्या महसूल विभागाने काही मासांपूर्वीच हे मैदान सरकारचे असल्याचे घोषित केल्यानंतर आता हिंदूंनी तेथे गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मागितली आहे. त्याला काँग्रेसचे स्थानिक आमदार जमीर अहमद खान यांनी विरोध केला आहे. त्यावर आमदार सी.टी. रवि यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

जमीर अहमद खान

१. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र शासनाकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हिंदु संघटनांनी या मैदानात तिरंगा फडकावण्याचीही अनुमती मागितली होती. ते पाहून मुसलमानांनीही तिरंगा फडकावण्याची अनुमती मागितली. त्यावर सरकारने दोघांनाही अनुमती नाकारून ‘सरकारी प्रतिनिधींकडून येथे तिरंगा फडकावण्यात येईल’, असे घोषित केले.

२. हिंदूंच्या संघटनांचे म्हणणे आहे की, जर हे मैदान आता सरकारी संपत्ती असेल, तर तिचा वापर सर्व धर्मियांना करता येऊ शकतो. त्यामुळे हिंदूंना येथे गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मिळाली पाहिजे. यावर प्रशासनाने ‘विचार करून निर्णय देऊ’, असे सांगितले आहे.