अमरावती येथे ‘हर घर तिरंगा’च्या प्रचार रथावर २ समाजकंटकांचे आक्रमण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक फाडले !

  • पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

अमरावती – केंद्र सरकारची ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम यशस्वी होण्यासाठी शहरात जनजागृतीसाठी निघालेल्या प्रचार रथावर २ समाजकंटकांनी आक्रमण केले. १२ ऑगस्ट या दिवशी येथील ‘कॉटन मार्केट’ परिसरामागे असणार्‍या ‘आदर्श’ या उपाहारगृहासमोर ही घटना घडली. या घटनेनंतर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘या आक्रमणाचा शहरात यापूर्वी घडलेल्या अन्य घटनांशी संबंध आहे का ?’, याचे अन्वेषण पोलिसांनी करावे’, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना केली.

अमरावती येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. असे असतांना शहरात या अभियानाला गालबोट लागले आहे. समाजकंटकांनी प्रचार रथावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे यांच्या छायाचित्रांसह ‘हर घर तिरंगा’ फेरी अभियानाचे फलकही फाडले.

हा देशाचा अवमान आहे ! – शिवराय कुलकर्णी, प्रवक्ते, भाजप

शिवराय कुलकर्णी म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून २ समाजांत तेढ निर्माण करणार्‍या अनेक घटना घडल्या आहेत. आजची घटना हा देशाचा अवमान आहे. ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हे अभियान यशस्वी व्हावे, यासाठी शहरात आमदार प्रवीण पोटे यांच्या माध्यमातून अनेक प्रचार रथ फिरत आहेत.’’

संपादकीय भूमिका

अमरावती येथे आतापर्यंत घडलेल्या समाजविघातक घटनांमागे कोण होते ?, हे सर्वांना ठाऊक आहे. पोलिसांनी याही प्रकरणाचे तात्काळ अन्वेषण करून समाजकंटकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तरच असे प्रकार थांबतील !