अटारी सीमेवरील भारताच्या सर्वांत उंच राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचा खलिस्तान्यांचा कट

अमृतसर (पंजाब) – भारत-पाक सीमेवरील अटारी येथे सर्वांत उंच राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचा कट ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने रचला आहे. येथे ३६० फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आहे.

१.या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात बुरखा घातलेली एक महिला दिसत आहे. त्यात ती म्हणते, ‘‘सिख फॉर जस्टिस’ संघटनेला काश्मीरच्या फुटीरतावाद्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. अटारी ही शिखांच्या गुरूंची भूमी आहे; मात्र भारत तेथे तिरंगा झेंडा फडकावत आहे. शिखांच्या भूमीवर गेल्या ७५ वर्षांपासून भारताने नियंत्रण मिळवले आहे. आमचा उद्देश अटारी सीमेवर तिरंग्याच्या ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचा आहे. ही निर्णायक वेळ आहे. आम्ही काश्मिरी मुजाहिदीन (जिहादसाठी लढणारे) खलिस्तानच्या युद्धात शीख बंधू-भगिनींसमवेत आहोत. अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे).’’

२. या व्हिडिओमध्ये २६ जानेवारी २०२१ मध्ये काल किल्ल्यावर तिरंगा काढून तेथे शीख शेतकर्‍यांकडून पिवळा ध्वज फडकावण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. यासह दुसर्‍या प्रसंगात तिरंगा ध्वजावर गोळीबार करण्यात येत असल्याचे दाखवले आहे.

३.अन्वेषण यंत्रणा या व्हिडिओची चौकशी करत आहेत. या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.