‘पुनर्नवा’ या वनस्पतीची स्वतःच्या घरी लागवड करा !

वैद्य मेघराज पराडकर

१. ओळख : ‘पुनर्नवा ही वनस्पती पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला तण म्हणून उगवते. (छायाचित्र पहा.) येता-जाता अशी वनस्पती कुठे दिसल्यास ती मुळापासून उपटून आणून घरी तिची लागवड करावी. या वनस्पतीचे खोड तांबूस असते. हिला गुलाबीसर रंगाची बारीक फुले येतात. ही भूमीलगत पसरणारी वनस्पती आहे. हिचे मूळ खोल असते. त्यामुळे वनस्पती उपटत असतांना तिचे मूळ तुटणार नाही, याची दक्षता घ्यावी.

२. औषधासाठी मुळासकट संपूर्ण वनस्पती वापरतात.

२ अ. बद्धकोष्ठता : पुनर्नव्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होते.

२ आ. मूत्रवहन संस्थेचे विकार : पुनर्नव्याच्या रोपाचा फूटभर लांबीचा तुकडा कापून धुवून मिक्सरमध्ये वाटून रस काढावा. रस येण्यासाठी वाटतांना अर्धी वाटी पाणी घालावे. असा प्रत्येकी अर्धी वाटी रस सकाळी आणि सायंकाळी घेतल्यास मूत्रपिंडांची सूज उतरण्यास, तसेच लघवी स्वच्छ होण्यास साहाय्य होते. मूतखड्यासाठीही याप्रमाणेच रस घ्यावा. हा उपचार साधारण १ मास करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२२)

सनातनचे ‘पुनर्नवा चूर्ण’ हे औषधही उपलब्ध आहे. ताजी वनस्पती उपलब्ध नसल्यास त्याऐवजी याचा वापर करता येतो. वनस्पतीची लागवड आणि वापर करण्यापूर्वी ती वनस्पती पुनर्नवाच आहे ना, याची जाणकाराकडून निश्चिती करून घ्यावी. चुकीची वनस्पती वापरल्यास अपाय होऊ शकतो. येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषध घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.