वाई (जिल्हा सातारा) येथील पू. (श्रीमती) मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

पू. (श्रीमती) मालती शहा

 वाई (जिल्हा सातारा) – मूळ पुणे येथील आणि सध्या वाई येथे रहाणार्‍या श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्या, हे आनंदवृत्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी सर्वांना दिले. संत सन्मानप्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये, सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), त्यांची मुलगी कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), कु. प्राची शिंत्रे, पू. (श्रीमती) शहाआजींचे सर्व कुटुंबीय आणि सातारा येथील सनातनचे काही साधक उपस्थित होते. संत म्हणून घोषित झाल्यानंतर पू. आजींनी भोळ्या भावाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी नमस्कार अर्पित केला. उपस्थित सर्वांनीच या सोहळ्यात भावानंद अनुभवला.

पू. (श्रीमती) शहाआजींना हार घालून त्यांचा सन्मान करतांना सद्गुरु स्वाती खाडये

प्रेमभाव, स्थिर वृत्ती आणि देवावर दृढ श्रद्धा असणार्‍या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) सनातनच्या १२० व्या संतपदावर विराजमान !

‘पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. पहिल्यापासूनच त्यांची दत्तगुरूंवर श्रद्धा आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. मूळचीच सात्त्विक वृत्ती आणि देवाप्रती ओढ असल्याने त्यांनी लगेच नामजपाला आरंभ केला अन् त्या सेवाही करू लागल्या.

आजींच्या घरी सेवेच्या निमित्ताने अनेक साधक यायचे. आजींनी आपल्या प्रेमभावामुळे त्या सर्वांना आपलेसे करून घेतले आहे. आजींच्या प्रेमळ आणि आतिथ्यशील स्वभावामुळे साधकांनाही त्यांच्या सहवासात रहावेसे वाटते.

आजींच्या आयुष्यात अनेक प्रतिकूल प्रसंग आले. साधनेमुळे आलेली सहनशीलता आणि देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे त्यांनी ते सर्व प्रसंग स्थिरतेने स्वीकारले. आजींच्या यजमानांचे आणि त्यांच्या बहिणीचे निधन झाले. तेव्हा कुटुंबीय आणि साधक यांना त्यांच्यातील स्थिरतेचे दर्शन घडले.

आजींनी त्यांच्या मुलांवरही चांगले संस्कार केले आहेत. त्यांचा मोठा मुलगा श्री. शिरीष शहा (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचे पूर्ण कुटुंब सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे.

वयोमानामुळे आजींची प्रकृती ठीक नसते, तरी त्या देवाच्या अखंड अनुसंधानात असतात. स्थिरता, निरासक्त वृत्ती आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे आजींची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. आजच्या शुभदिनी श्रीमती मालती शहाआजी यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनच्या १२० व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत.

‘पू. (श्रीमती) मालती नवनीतदास शहा यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.८.२०२२) 

सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी चैतन्यदायी वाणीतून उलगडले दैवी गुणरत्ने असणार्‍या श्रीमती मालती शहाआजी यांच्या संतत्वाचे गुपित !

सद्गुरु स्वाती खाडये

 १. प्रेमळ आणि आनंदी असणार्‍या शहाआजी !

श्रीमती मालती नवनीतदास शहा यांची मूळची सात्त्विक वृत्ती आणि साधकांविषयी प्रेमभाव यांमुळे साधकांनाही त्यांच्या सहवासात रहावेसे वाटायचे. पू. आजी पूर्वी त्यांच्या कुटुंबासमवेत गावठाण, पुणे येथील काळाराम मंदिरातील एका खोलीत रहायच्या. त्या वेळी त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिवस व्यतीत करावे लागले; पण त्यातही त्या आनंदी आणि स्थिर असायच्या. सनातनचे साधक त्यांच्या घरी गेल्यावर त्या साधकांची पुष्कळ आपुलकीने काळजी घेत. साधकांना काही खाऊ दिल्याविना त्या पाठवत नसत. सर्व साधकांची त्या प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी करत. साधकांनाही त्यांच्याविषयी पुष्कळ प्रेम वाटते.

पू. आजींच्या चरणी नतमस्तक झालेल्या सद्गुरु स्वाती खाडये

२. स्वतःतील उत्कट भावभक्तीचे दर्शन घडवणार्‍या शहाआजी !

त्यांची श्रीराम आणि दत्तगुरु यांच्यावर अपार श्रद्धा आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीही त्यांच्या मनात पुष्कळ भाव आहे. त्यांचे स्मरण केल्याविना पू. आजी पाणीही पीत नाहीत. त्यांच्यातील उत्कट भाव आणि भक्ती यांमुळे त्यांच्या मुलांमध्येही साधना अन् भावभक्ती यांचे बीज रुजले.

३. सहनशील असणार्‍या आणि प्रतिकूल स्थितीत स्थिर रहाणार्‍या आजी ! 

आजी पुष्कळ सहनशील आहेत. आजींच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, तरीही त्या स्थिर राहिल्या. सध्या त्यांना बर्‍याच शारीरिक मर्यादा आहेत. त्यांचा एक पाय अधू असल्याने त्यांना खोलीच्या बाहेर जाता येत नाही. पूर्वी एवढ्या साधकांमध्ये वावरलेल्या आजींना आज एका खोलीतच रहावे लागत आहे; पण त्यांनी ही परिस्थिती स्वीकारली आहे. या स्थितीतही त्यांचा अखंड जप चालू असतो. त्या सतत भगवंताच्या अनुसंधानात असतात. त्यांच्यातील या दैवी गुणांमुळेच त्या आज सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत.


पू. (श्रीमती) मालती शहा यांची साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

१. पू. आजींचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीराम यांच्याप्रती असणारा भोळा भाव पाहून मन भावविभोर होते ! – सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे

संतसोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते. पू. आजींचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीराम यांच्याप्रती असणारा भोळा भाव पाहून आपले मनही भावविभोर होते. पू. आजींना पुष्कळ शारीरिक मर्यादा आहेत; पण त्याविषयी त्यांनी कधीच तक्रार केली नाही. त्या कधीच नकारात्मक झाल्या नाहीत. जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर आलेल्या सर्व परिस्थिती त्यांनी स्थिरपणे स्वीकारल्या. सध्या त्या रहात असलेल्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूला अतिशय अल्प लोक आहेत, तरीही त्यांनी ती परिस्थिती स्थिरपणे स्वीकारलेली आहे.

२. आजींकडे पाहिल्यावर ‘त्या संत आहेत’, असे वाटायचे ! – कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) (वय १० वर्षे), पुणे

पू. आजींकडे आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. काळाराम मंदिरात होत असलेल्या सनातन संस्थेच्या सत्संगांना मी पूर्वी जायचे, त्या वेळी पू. आजींचे घर म्हणजे आश्रम असल्यासारखेच वाटायचे. पू. आजी माझी पुष्कळ काळजी घ्यायच्या आणि मला आनंद द्यायच्या. त्यामुळे ‘कधी एकदा काळाराम मंदिरात जाऊ’, असे मला व्हायचे. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्या संतच आहेत’, असे मला वाटायचे. आज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आपल्या सर्वांना पू. आजींच्या रूपात अनमोल भेट दिली, त्याविषयी मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.


सौ. मनीषा पाठक यांना पू. (श्रीमती) शहा यांची त्या संत होण्यापूर्वी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये  !

१. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे

पूर्वी त्या पुण्यातील एका वाड्यात रहात होत्या. त्या वाड्यात श्रीराम मंदिर होते. आजूबाजूला अनेक माणसे असायची. आता आजी वाई (जिल्हा सातारा) येथे रहायला आल्यावर आजूबाजूला अधिक माणसे नसतात. हा पालट आजींनी स्वीकारला आहे.

२. जाणवलेले पालट

अ. ‘आजींचा तोंडवळा अधिक तेजस्वी झाला आहे’, असे त्यांचे छायाचित्र पाहून मला जाणवले.

आ. आजींमधील भावनाशीलता न्यून झाली असून आधीच्या तुलनेत त्यांची स्थिरता वाढली आहे.

इ. ‘आजी संत झाल्या आहेत’, असे मला वाटते.’ (‘४.८.२०२२ या दिवशी श्रीमती मालती शहाआजी संत झाल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक)

(‘ही सूत्रे श्रीमती मालती शहाआजी संत होण्यापूर्वीची असल्याने त्यांचा उल्लेख ‘पूज्य’ असा केलेला नाही.’ – संकलक)

– सौ. मनीषा पाठक, पुणे (लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.७.२०२२)


कोणतीही परिस्थिती सहजतेने स्वीकारणारी पू. आई !

श्री. शिरीष शहा (मोठा मुलगा) यांनी व्यक्त केलेले मनोगत

१. पू. आईमुळे स्वतःत साधनेचे बीज रुजले !

श्री. शिरीष शहा

मला पू. आईकडून साधनेचे संस्कार मिळाले. तिच्यामुळेच माझ्यात साधनेचे बीज रुजले. तिच्यातील भावभक्तीमुळे मी साधनेत येऊ शकलो. माझ्या वडिलांच्या निधनानंतरही ती पुष्कळ स्थिर होती.

१ अ. आजी सध्या करत असलेली साधना : ‘माझी आई (श्रीमती मालती नवनीतदास शहा) सध्या नामजप करते. ती नियमित हरिपाठ, मारुतिस्तोत्र आणि श्रीरामरक्षा वाचते. ती बगलामुखी स्तोत्र आणि देवीकवच ऐकते.

१ आ. शारीरिक स्थितीत सुधारणा झाल्यावर स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणे : आई पूर्वी पुण्यात रहात असतांना २ वर्षांपूर्वी स्नानगृहात पडली होती. त्यानंतर २ मास तिला हालचाल करता येत नव्हती. मागील दीड वर्ष मी तिला अंघोळ घालत असे. रात्री तिला लघवीसाठी बेडपॅन (लघवी करण्यासाठी भांडे) ठेवावे लागत असे किंवा डायपर (मल-मूत्र शोषून घेणारे वस्त्र) घालावे लागत असे. आता ती स्वतः स्नानगृहापर्यंत चालत जाते. या वयातही ती सकाळी लवकर उठून अंघोळ करते.

१ इ. कोणतीही परिस्थिती सहजतेने स्वीकारणे 

१. मागील वर्षी आईच्या मोठ्या बहिणीचे (श्रीमती शकुंतला सुगंधी यांचे) निधन झाले. ही वार्ता तिला सांगितल्यावर ती ‘बरं’, एवढेच म्हणाली. तिने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

२. माझा भाऊ (श्री. प्रकाश शहा, वय ५८ वर्षे) पुण्यात असतो. तो म्हणाला, ‘‘मी आईला भेटायला येतो.’’ तेव्हा आई म्हणाली, ‘‘इकडे यायला नको. इथे यायला २ घंटे लागतात. आपण भ्रमणभाषवरच बोलूया.’’

३. आमच्या घरातील दूरचित्रवाणी संच तळमजल्यावर आहे. पूर्वी तिची खोली तेथे असल्याने ती दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहात असे. आता ती वरच्या मजल्यावर रहाते. तिथे दूरचित्रवाणी संच नाही. तिला त्याचे काही वाटत नाही. पूर्वी ती आकाशवाणीवर भावगीते ऐकत असे. काही मासांपूर्वी आमचा ‘रेडिओ’ही बंद झाला आहे. त्याविषयीही तिचे गार्‍हाणे नसते.

१ ई. जाणवलेला पालट – ‘तिच्यातील स्थिरता वाढली आहे’, असे मला गेल्या काही दिवसांपासून जाणवत होते.’

– श्री. शिरीष शहा (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६० वर्षे) (मोठा मुलगा), पुणे


पू. शहाआजींच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

पू. आजींच्या संतसन्मानप्रसंगी दैवी नियोजनाची प्रचीती आली ! – सौ. पूजा शिरीष शहा (पू. शहाआजी यांच्या स्नुषा)

पू. आजींचा दत्ताप्रती पुष्कळ भाव आहे. दत्ताचे नाम त्यांच्या मुखात अखंड असते. आजी संतपदी विराजमान झाल्या. योगायोगाने आज (संतसन्मान झाला, तो दिवस (४ ऑगस्ट)) गुरुवारच दत्ताचा वार आहे. ज्या परात्पर गुरुदेवांवर त्यांची अपार श्रद्धा आहे, ते गुरुदेवही दत्तगुरूंचेच रूप आहेत. हे सगळे इतक्या दैवी पद्धतीने जुळून आले की, यातून मला दैवी नियोजनाची अनुभूती घेता आली. (आजींना संत म्हणून घोषित केल्यापासून सौ. पूजा शहा यांचा भाव पुष्कळ दाटून येत होता.)

सहनशीलतेचा महामेरू म्हणजे पू. आजी ! – श्री. नचिकेत शिरीष शहा (पू. शहाआजी यांचा नातू)

पू. आजी म्हणजे सहनशीलतेचा महामेरू आहे. देवाप्रती भाव कसा असावा ? हे मला पू. आजीकडून शिकायला मिळाले. पू. आजीची सेवा करतांना, तिला जेवण किंवा पाणी देतांना ‘आपण आपल्या आजीची नाही, तर संतांची सेवा करत आहोत’, असे गेल्या काही दिवसांपासून आतूनच वाटत होते.

अनुसंधानात कसे रहायचे, हे पू. आजींकडून शिकायला मिळाले ! – सौ. तेजल नचिकेत शहा (पू. शहाआजी यांची नातसून)

साधना म्हणजे काय ? अनुसंधान म्हणजे काय ? अनुसंधानात कसे रहायचे ? हे पू. आजींकडून मला शिकायला मिळते. पू. आजी सगळ्या देवांच्या आरत्या, मनाचे श्लोक, तसेच रामरक्षा म्हणतात. स्वतःची कामे त्या स्वतःच करण्याचा प्रयत्न करतात.