‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘आजकाल जगातील अनेक देशांत ‘झुम्बा डान्स वर्कआऊट’ (व्यायाम) अतिशय लोकप्रिय होत आहे. सध्या जगभरातील १८० देशांमध्ये ‘झुम्बा डान्स’चे क्लासेस (प्रशिक्षण वर्ग) घेतले जातात. ‘झुम्बा डान्स’मध्ये ‘एरोबिक्स’ला (Aerobics) (शरिरातील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी केला जाणारा व्यायाम प्रकार) ‘वेस्टर्न म्युझिक’ (Western Music – पाश्चात्त्य संगीत) आणि ‘वेस्टर्न डान्स’ (Western Dance – पाश्चात्त्य नृत्य) यांची जोड देण्यात आली आहे. हा व्यायाम प्रकार ‘कोलंबिया’ या देशातील आहे. ‘झुम्बा डान्स’ केल्याने संपूर्ण शरिराचा व्यायाम होतो, तसेच हा व्यायाम प्रकार केल्याने शरिरातील मेद झडून शरीर सुडौल होणे, मानसिक थकवा अल्प होणे, आत्मविश्वास वाढणे इत्यादी लाभ होतात’, असे ‘झुम्बा डान्स’चे जाणकार सांगतात.
‘झुम्बा डान्स’ व्यायाम केल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या वैज्ञानिक उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
टीप – इथून पुढे लेखात ‘झुम्बा डान्स’ व्यायामाला ‘झुम्बा व्यायाम’ असे संबोधण्यात आले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत झुम्बा-प्रशिक्षकाने आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांना झुम्बा व्यायाम प्रकार शिकवला. झुम्बा व्यायाम करण्यापूर्वी अन् केल्यानंतर त्या सर्वांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. झुम्बा व्यायाम केल्याने झुम्बा-प्रशिक्षक आणि आध्यात्मिक त्रास असलेले अन् नसलेले साधक यांच्यावर झालेले परिणाम पुढे दिले आहेत.
१ अ. ‘झुम्बा’ व्यायाम केल्याने झुम्बा-प्रशिक्षक आणि आध्यात्मिक त्रास असलेले अन् नसलेले साधक यांच्यावर झालेले परिणाम
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात –
१. झुम्बा व्यायाम केल्यानंतर झुम्बा-प्रशिक्षकातील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा अल्प झाल्या. (याचे कारण सूत्र ‘३ ई १’यामध्ये दिले आहे.) झुम्बा-प्रशिक्षकामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२. झुम्बा व्यायाम केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांमध्ये वाढ झाली. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
३. झुम्बा व्यायाम केल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली, त्याच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
२. निष्कर्ष
‘झुम्बा’ व्यायामाचा आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांच्यावर नकारात्मक परिणाम झाला.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. ‘झुम्बा’ व्यायामातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे : व्यायाम केल्याने शरिरात साठलेली त्रासदायक ऊर्जा अल्प किंवा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते किंवा तिच्यात वाढ होणे अपेक्षित आहे; पण असे लाभ सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम इत्यादी केल्याने होतात. झुम्बा व्यायाम करतांना शरिराच्या केल्या जाणार्या असात्त्विक हालचाली, तसेच व्यायामाला असात्त्विक पाश्चात्त्य संगीत अन् नृत्य यांची दिलेली जोड, यांमुळे या व्यायामातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित झाली. या त्रासदायक स्पंदनांमुळे आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांच्यावर नकारात्मक परिणाम झाले.
३ आ. झुम्बा व्यायामाचा आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांच्यावर नकारात्मक परिणाम होणे
३ आ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक : चाचणीतील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. व्यायाम करण्यापूर्वी त्या साधकांमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होती. झुम्बा व्यायाम प्रकार केल्यानंतर साधकांतील नकारात्मक ऊर्जांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. याचे कारण हे की, झुम्बा व्यायाम प्रकारातून प्रक्षेपित झालेल्या त्रासदायक स्पंदनांमुळे साधकांच्या देहातील त्रासदायक शक्तींची स्थाने जागृत होऊन ती कार्यरत झाली आणि त्या स्थानांनी या व्यायामातून प्रक्षेपित झालेली त्रासदायक स्पंदने ग्रहण केली. त्यामुळे साधकांभोवती असलेल्या काळ्या (त्रासदायक स्पंदनांच्या) आवरणात वाढ झाली.
‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीभोवतीचे काळे (त्रासदायक स्पंदनांचे) आवरण, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या देहातील वाईट शक्तींनी साठवलेली त्रासदायक स्पंदने दर्शवते. |
३ आ २. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक : व्यायाम करण्यापूर्वी साधकामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जाही होती. झुम्बा व्यायाम प्रकारातून प्रक्षेपित झालेल्या त्रासदायक स्पंदनांमुळे साधकाच्या देहात त्रासदायक शक्तीची (‘अल्ट्राव्हायोलेट’) स्पंदने निर्माण झाली आणि त्याच्याभोवती असलेल्या काळ्या आवरणात (‘इन्फ्रारेड’मध्ये) वाढ झाली, तसेच त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान
३ इ. झुम्बा व्यायाम केल्यानंतर चाचणीतील साधकांना झालेले त्रास : झुम्बा व्यायाम केल्यानंतर चाचणीतील तिन्ही साधकांना स्वतःभोवतीच्या काळ्या (त्रासदायक) आवरणात वाढ झाल्याचे जाणवले. त्यांनी सांगितले, ‘झुम्बा व्यायाम केल्यानंतर डोके जड होणे, थकवा येणे, मन अस्वस्थ होणे इत्यादी त्रास झाले.’
३ ई. झुम्बा व्यायाम केल्यानंतर झुम्बा-प्रशिक्षकातील नकारात्मक ऊर्जेत वाढ न होता, उलट त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होण्यामागील आणि अन्य साधकांतील नकारात्मक ऊर्जेत वाढ होण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : ‘झुम्बा व्यायाम’ हा रज-तम प्रधान गुणांचा व्यायाम प्रकार आहे. याची दोन कारणे आहेत. झुम्बा व्यायाम करतांना लावलेले पार्श्वसंगीत अत्यंत रज-तम प्रधान असते. हे संगीत ऐकल्यामुळे त्यांतून त्रासदायक शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होऊन व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावरील त्रासदायक आवरण वाढते, तसेच हा व्यायाम प्रकार असात्त्विकही आहे. त्यामुळे पाश्चात्त्य पार्श्वसंगीतावर झुम्बा व्यायाम केल्यामुळे व्यक्तीच्या देहामध्ये आणि देहाभोवती रज-तम प्रधान गुणांचे त्रासदायक आवरण निर्माण होते. झुम्बाचे संगीत आणि व्यायाम प्रकार यांमध्ये मायावी स्पंदने असल्यामुळे ते संगीत ऐकतांना व्यक्तीला मायावी सुखाची अनुभूती येऊन झुम्बा व्यायाम प्रकार करण्यासाठी उत्साह वाटतो.
झुम्बा व्यायाम करतांना झुम्बा-प्रशिक्षकामध्ये कार्यरत झालेल्या त्रासदायक शक्तीचे आश्रमातील चैतन्याशी सूक्ष्मातून पुष्कळ युद्ध झाले. या सूक्ष्म युद्धात प्रशिक्षकामध्ये कार्यरत असणार्या त्रासदायक शक्तीचा पुष्कळ प्रमाणात व्यय झाल्यामुळे तिचे (प्रशिक्षकातील नकारात्मक ऊर्जेचे) प्रमाण न्यून झाले. यावरून आश्रमामध्ये चैतन्य कार्यरत असल्यामुळे येथे रज-तम प्रधान कृती केल्यावर त्या कृतीतील त्या गुणांचे प्रमाण न्यून होते आणि सत्त्वप्रधान कृती केल्यास उदा. भरतनाट्यम् नृत्य केल्यास सात्त्विकता पुष्कळ प्रमाणात वाढते. प्रशिक्षकाने झुम्बा व्यायाम प्रकार आश्रमाच्या बाहेर म्हणजे अन्य ठिकाणी केला असता, तर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली असती. झुंबा-प्रशिक्षक ही आश्रमाबाहेरील व्यक्ती असल्याने ती आश्रमात आल्यावर तिच्यावर आश्रमातील चैतन्याचा परिणाम झाला.
चाचणीतील झुम्बा व्यायाम करणारे साधक हे आश्रमातीलच होते. त्यामुळे त्यांच्यावर आश्रमातील चैतन्याचा वेगळा असा परिणाम झाला नाही. त्यांच्यावर झुम्बा व्यायामातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक शक्तीचाच परिणाम झाला. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना त्रास देणार्या वाईट शक्तींनी पार्श्वसंगीत आणि व्यायाम प्रकार यांतून प्रक्षेपित होणारी त्रासदायक शक्ती साठवल्यामुळे त्या साधकांच्या भोवतीचे त्रासदायक किंवा नकारात्मक शक्तीचे प्रमाण वाढले.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०२१)
४. सारांश
थोडक्यात, ‘झुम्बा व्यायामातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. या त्रासदायक स्पंदनांमुळे झुम्बा व्यायाम करणार्या व्यक्तींवर आध्यात्मिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतात’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.३.२०२१)
ई-मेल : [email protected]
सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !‘आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी मानवाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले रहावे, तसेच त्याला आध्यात्मिक लाभ व्हावा म्हणून सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम यांसारख्या उपयुक्त गोष्टींचे सखोल ज्ञान मानवाला उपलब्ध करून दिले. सूर्यनमस्कार, योगासने अन् प्राणायाम केल्याने व्यक्तीला होणारे शारीरिक आणि मानसिक लाभ; सर्वश्रुत आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांच्या संदर्भात आध्यात्मिक संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या वैज्ञानिक चाचण्यांतून ‘व्यक्तीने सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम केल्याने ‘तिच्यातील नकारात्मक स्पंदने पुष्कळ अल्प किंवा नाहीशी होऊन तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदने निर्माण होणे किंवा त्यात वाढ होणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात’, हे स्पष्ट झाले आहे. हा अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्या ऋषिमुनींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !’ – सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.३.२०२१) |
संपादकीय भूमिकासूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांमुळे सर्वाधिक लाभ होतात, यातून ऋषिमुनींची महानता जाणा ! |
|