काँग्रेसची महागाईच्या प्रश्‍नावरून देशभरात निदर्शने

राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक खासदार कह्यात

नवी देहली – देशातील वाढती महागाई, वस्तू आणि सेवा कर यांची वाढ, तसेच केंद्र सरकारची धोरणे, यांविरोधात काँग्रेसकडून ५ ऑगस्ट या दिवशी देशभरात निदर्शने करण्यात आली. या अंतर्गत संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्यासह काँग्रेसच्या अनेक खासदारांना पोलिसांनी कह्यात घेतले. या निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर जंतरमंतर परिसर वगळता संपूर्ण देहलीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तत्पूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे परिधान करून संसदेत आले आणि त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

आंदोलनापूर्वी सकाळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी हातावर काळी पट्टी बांधली होती. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकार हुकूमशाही राबवत आहे का ? येथे प्रतिदिन लोकशाहीची हत्या होत आहे. या सरकारने ८ वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त केली. देशातील माध्यमे आणि निवडणूक व्यवस्था यांच्या आधारे विरोधी पक्ष आवाज उठवू शकतो; पण आज देशातील प्रत्येक संस्थेत रा.स्व. संघाचा माणूस बसलेला असतो. तो सरकारच्या नियंत्रणात आहे. आज कुणी विरोध केला, तर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांना त्याच्या विरोधात उभे केले जाते.’’