उदय लळीत होणार देशाचे ४९ वे सरन्यायाधीश !

नवी देहली – न्यायमूर्ती उदय लळीत हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी ४ ऑगस्टला देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली. ए.व्ही. रमणा हे २६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर उदय लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती लळीत हे ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील.

न्यायमूर्ती उदय लळीत यांचा अल्पपरिचय

न्यायमूर्ती उदय लळीत हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून देवगड तालुक्यातील कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. विशेष म्हणजे लळीत कुटुंबात पिढ्यानुपिढ्या वकिलीचा व्यवसाय केला जातो. पुढे उदय लळीत यांनीही तोच व्यवसाय निवडला. मुंबईत वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर वर्ष १९८३ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय चालू केला. त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये ते देहलीत स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. १३ ऑगस्ट २०१४ या दिवशी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.