जपानमध्ये लोकसंख्येत घट  !

विद्यार्थी संख्येवर परिणाम झाल्याने अनेक शाळांना टाळे

टोकियो  (जपान) – जपानमध्ये १९७० च्या दशकापासून लोकसंख्येत सातत्याने घट होत आहे. श्रम कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वर्ष २०२१ मध्ये ८ लाख ११ सहस्र ६०४ मुलांचा जन्म झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० सहस्रांनी अल्प आहे. गेल्या ६ वर्षांत प्रजनन दरात १.४४ ने घट होऊन तो १.३० वर पोचला आहे.

१. जपानमध्ये ३० वर्षीय २५.४ टक्के महिला, तर २६.५ टक्के पुरुष आहेत. त्यांपैकी १९ टक्के पुरुष आणि १४ टक्के महिला विवाह करू इच्छित नाहीत. वर्ष २०२१ मध्ये जपानमध्ये ५ लाख १४ सहस्र विवाह झाले. वर्ष १९४५ मध्ये झालेल्या दुसर्‍या महायुद्धानंतरची ही सर्वांत अल्प विवाहसंख्या ठरली आहे. वर्ष १९७० मध्ये १० लाखांहून अधिक विवाह झाले होते.

२. जपानमध्ये गेल्या एका दशकात विद्यार्थी संख्येत अनुमाने १० लाखांहून अधिक घट झाली आहे. सरकारी पहाणीनुसार विद्यार्थी संख्या १० वर्षांत ३० टक्क्यांनी घटली आहे. देशातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या केवळ ३ सहस्र एवढी राहिली आहे. वास्तविक देशात ही संख्या २९ सहस्र ७९३ एवढी होती. त्यातही ग्रामीण भागातील शाळा वेगाने बंद पडल्या. ओकुमा आणि फुकुशिमा प्रांतांत सर्वाधिक समस्या दिसून आली. तेथे १० वर्षांत विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९ टक्के अल्प झाले.