देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील : केवळ भाजपच शिल्लक रहाणार !  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दावा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा

पाटलीपुत्र (बिहार) – भाजपच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाही यांच्याविरोधात आहे. आपण जर आपल्या विचारसरणीवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (जे.पी.) नड्डा यांनी केले आहे. ते येथे बिहारमध्ये भाजपच्या १४ जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘शिवसेना संपत आलेला पक्ष आहे’, असेही विधान केले.

१. जे.पी. नड्डा यांनी या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगाणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, तमिळनाडूत घराणेशाही आहे. शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे.

२. नड्डा यांनी म्हटले की, काँग्रेसने कितीही प्रशिक्षण शिबिरे घेतली, तरी लाभ होणार नाही. टिकण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची आवश्यकता लागते. २ दिवसांत पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत.