बंदुकीचे उत्तर बंदुकीनेच मिळेल ! – तमिळनाडूच्या राज्यपालांची पाकिस्तानला चेतावणी

तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन्. रवि

कोची (केरळ) – तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन्. रवि यांनी पाकपुरस्कृत आतंकवादावर जोरदार टीका करतांना ‘बंदुकीचे उत्तर बंदुकीनेच मिळेल’ अशी चेतावणी पाकिस्तानला दिली. केरळमधील कोच्चि येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची एकता आणि अखंडता यांच्या विरोधात बोलणार्‍यांशी कुठलीच चर्चा केली जाणार नाही. गेल्या ८ वर्षांत कुठल्याही सशस्त्र गटाशी संवाद साधला गेला नाही आणि हीच भूमिका योग्य आहे, असे ते या वेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘पुलवामा आक्रमणानंतर आपण बालाकोटमध्ये हवाई आक्रमण करून पाकिस्तानला धडा शिकवला. जर तुम्ही आतंकवादी कृत्य केले, तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असा संदेश देण्यात आला होता. मुंबईवरील २६/११चे आतंकवादी आक्रमण झाले, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. मूठभर आतंकवाद्यांनी पाकला अपकीर्त केले होते. आजही पाक आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे.’’