वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांच्या कानाखाली मारत होते !

  • रतलाम (मध्यप्रदेश) वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग (छळ)

  • वसतीगृहाच्या ‘वॉर्डन’वर दारूच्या बाटल्यांद्वारे आक्रमणाचा प्रयत्न !  

(वॉर्डन म्हणजे व्यवस्था पहाणारा आणि शिस्त राखणारा अधिकारी)

रतलाम (मध्यप्रदेश) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात  वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांचे ‘रॅगिंग’ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना कानाखाली मारत असल्याचे दिसत आहे. ही घटना २ दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. ज्या वेळी ही माहिती वसतीगृहाचे ‘वॉर्डन’ डॉ. अनुराग जैन यांना समजली, तेव्हा ते तेथे पोचले; मात्र काही विद्यार्थ्यांनी जैन यांच्यावरच दारूच्या बाटल्या फेकून आक्रमण केले. यात ते थोडक्याच बचावले. यानंतर महाविद्यालयाच्या शिस्त समितीकडून कारवाई चालू करण्यात आली आहे. याविषयी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये यापूर्वीही ‘रॅगिंग’ची घटना घडल्याचे समोर आले होते. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांना ७ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते; मात्र त्यानंतरही येथील विद्यार्थ्यांना शिस्त लागलेली नाही, असे आताच्या घटनेतून लक्षात येते.

संपादकीय भूमिका

वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे डॉक्टर होऊन जनतेला वैद्यकीय सेवा देणार आहेत; मात्र त्यांच्यावर कोणते संस्कार झाले आहेत ?, हे या घटनेवरून लक्षात येते ! केवळ पुस्तकीय शिक्षण देणारे नव्हे, तर संस्कार करणारे शिक्षण हवे !