९ घंट्यांच्या चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत कह्यात !

मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई

संजय राऊत

मुंबई –  गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा भांडुप येथील ‘मैत्री’ बंगला, तसेच दादर येथे असलेली सदनिका येथे अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) धाड टाकण्यात आली. ९ घंट्यांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने कह्यात घेतले. दुपारी ४.५५ वाजता अधिकार्‍यांनी त्यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात नेण्यासाठी बाहेर आणले. अधिकारी नेत असतांना संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दोन्ही हात उंचावून भगवे वस्त्र दाखवले. गोरेगावमधील पत्राचाळीच्या पुनर्विकासाच्या बांधकामात आर्थिक अपहार केल्याच्या आरोपावरून यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली होती.

पोलिसांनी शिवसैनिकांना घेतले कह्यात !

ईडीकडून चौकशी चालू असतांना संजय राऊत यांच्या निवासस्थानाच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना कह्यात घेतले.

काय आहे पत्राचाळ जमीन घोटाळ्याचे प्रकरण ?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत ‘महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणा’चा (‘म्हाडा’चा) भूखंड आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु ‘आशिष कन्स्ट्रक्शन’ आस्थापनाला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते; मात्र ‘त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकाला विकला’, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळीमध्ये रहाणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘गुरु आशिष कन्स्ट्रक्शन’ला पत्राचाळीच्या ठिकाणी ३ सहस्र सदनिका बांधायच्या होत्या. त्यांपैकी ६७२ सदनिका भाडेकरूंना, तर उर्वरित सदनिका म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायच्या होत्या; परंतु वर्ष २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी ‘गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी’चे २५ भाग ‘एच्.डी.आय.एल्.’ला विकले. यानंतर वर्ष २०११ ते २०१३ या कालावधीत भूखंडाचे अनेक भाग अन्य खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले. या जमीन घोटाळ्यात १ सहस्र ३४ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आला आहे. प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक झाली आहे. त्यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये वळवण्यात आले होते. हे पैसे १० वर्षांनी पुन्हा प्रवीण राऊत यांच्या खात्यात जमा आहेत. या आर्थिक अपहारात संजय राऊत हेही सहभागी असल्याचा अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप आहे.

माझ्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

मी कारवाईला घाबरत नाही. माझ्या विरोधात खोटी कागदपत्रे सिद्धी केली जात आहेत. महाराष्ट्र कमकुवत केला जात आहे. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आहे. मरेन; पण झुकणार नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी शिवसेना सोडणार नाही. माझ्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. अंमलबजावणी संचालनालय मला अटक करणार आहे आणि मी अटक करून घेणार आहे.

कोणतेच पुरावे सापडले नाहीत ! – आमदार सुनील राऊत (संजय राऊत यांचे बंधू)

संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली नाही. पत्राचाळविषयी कोणतीही कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांना सापडलेली नाहीत.

हे सर्व कारस्थान म्हणजे निर्लज्जपणाचा कळस ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

‘संजय राऊत यांनी ३१ जुलै या दिवशी दैनिक ‘सामना’ मध्ये लिहिलेल्या ‘रोखठोक’ या सदरामध्ये काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. हे सर्व कारस्थान म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. लाज, लज्जा, शरम सोडून हे कारस्थान चालू आहे’, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. संजय राऊत यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. या वेळी शिवसैनिकांशी संवाद साधतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.