‘दहीहंडी’ सणाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित !

मुंबई – कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे राज्यशासनाने सणांवरील निर्बंध मागे घेतले आहेत. त्यानुसार आता ‘दहीहंडी’ या सणाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित करण्यात आली आहे. तसे परिपत्रकही काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार १९ ऑगस्ट २०२२ या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असेल. सण साजरे करतांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना लवकर परवाने मिळावेत म्हणून राज्य सरकारने एक खिडकी योजना चालू केली आहे. ‘मंडप, तसेच इतर अनुमती लवकर मिळावी, यासाठी ‘एक खिडकी योजना’, तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्व अनुमती देण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ‘कुठेही क्लिष्ट अटी नकोत’, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ‘गणेशोत्सव मंडळांकडून नोंदणी शुल्क घेण्यात येऊ नये, हमीपत्रही घेऊ नका’, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे. उत्सव साजरा करतांना नियमांचा बागुलबुवा नको’, असेही निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत. ‘मुंबईतील नियमावली राज्यभर लागू असेल’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच सांगितले आहे.