पाकिस्तानात राज्यघटनेनुसार नव्हे, तर शरीयत कायद्यानुसार शासन चालवावे !

आतंकवादी संघटनेची पाक सरकारला धमकी !

इस्लामाबाद/काबूल – पाकिस्तान सरकार आणि सैन्य शरीयत कायद्यात सांगितलेल्या मार्गाचे अनुकरण करत नाहीत. पाकिस्तानी राजकारणी, सैनिक आणि न्यायव्यवस्था शरीयत कायद्याऐवजी राज्यघटनेनुसार कार्यवाही करतात. पाकिस्तानात राज्यघटनेनुसार नाही, तर शरीयत कायद्यानुसार शासन चालवावे, अशी चेतावणी ‘तहरीक-ए-तालिबान’च्या (टीटीपीच्या) आतंकवाद्यांनी दिली.


‘टीटीपी’च्या आतंकवाद्यांचा तळ काबुल येथे आहे. या आतंकवाद्यांचे मन वळवण्यासाठी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने देवबंदी उलेमांचे (इस्लामी कायद्यांचे ज्ञान असणार्‍यांचे) एक १३ सदस्यीय पथक काबुलला पाठवले होते. या पथकाने ‘टीटीपी’चे प्रमुख मुफ्ती नूर वली आणि इतर तालिबानी नेते यांची भेट घेऊन पाकिस्तान सरकारची भूमिका मांडली. ‘टीटीपी’ने फाटा या आदिवासी क्षेत्राला खैबर पख्तूनख्वा प्रांतातून वेगळे करण्याची मागणी सोडून द्यावी’, ‘पाकिस्तानी सैनिकांच्या विरोधात हिंसाचार करू नये’, अशा मागण्या उलेमांनी केल्या होत्या; पण त्या फेटाळण्यात आल्या.  ‘टीटीपी’ला पाकिस्तानमधील आदिवासी क्षेत्र असलेल्या फाटावर राज्य करायचे आहे. त्यांना फाटामध्ये तालिबानसारखा शरीयतसारखा कायदा लागू करायचा आहे.

संपादकीय भूमिका

पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे वर्चस्व वाढत असतांना भविष्यात पाक पूर्णतः आतंकवाद्यांच्या कह्यात जाऊन तेथे शरीयत कायदे लागू झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !