ठाणे, २७ जुलै (वार्ता.) – वाढणार्या देशविरोधी घटनांचा निषेध करण्यासाठी ठाणे आणि उल्हासनगर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘सकल हिंदु समाज पदयात्रा’ काढण्यात आली. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणी पदयात्रा आल्यावर हनुमान चालिसा पठण आणि महाआरती करून पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत सर्व जाती-पंथाचे लोक, तसेच पक्ष आणि विविध संस्थांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते. पदयात्रेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे, तसेच ठाणे येथील वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. एकनाथ महाराज, क्षेत्र संघटन मंत्री श्री. श्रीरंग राजे, श्री. वरदराज बापट, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे मनोगत
१. श्री. वरदराज बापट म्हणाले, ‘‘हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या घडवून आणल्या जात आहेत; पण अशा घटनांना घाबरून आम्ही आमचे कार्य बंद करणार नाही.’’
२. आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ‘‘पी.एफ्.आय.’वर (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर) बंदीची मागणी केली, तरच अशा गोष्टींना आळा बसेल.’’
३. श्री. श्रीरंग राजे म्हणाले, ‘‘कुणीही हिंदु अत्याचार सहन करणार नाही. या अत्याचाराला संघटितपणे विरोध करायला सिद्ध व्हा.’’
उल्हासनगर येथील पदयात्रेत भगवे ध्वज घेऊन घोषणा !
उल्हासनगर येथेही अशी पदयात्रा काढण्यात आली. या वेळी कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. पदयात्रेत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तसेच दुर्गा वाहिनी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते भगवे ध्वज घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते. येथील भाजपचे आमदार कुमार आयलानी, बजरंग दलाचे सुनील कनोजिया आणि संतोष खारीक यांच्यासह राजकीय पक्ष आणि अन्य सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनीही पदयात्रेत सहभाग घेतला.
मुलुंड येथे पदयात्रा, शंखनाद आणि महाआरती !
मुलुंड येथे ‘सकल हिंदू समाज पदयात्रा, शंखनाद आणि महाआरती’चे आयोजन करण्यात आले होते. यात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री राम सेना, गायत्री परिवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचा यात सहभाग होता. हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना थांबल्या नाहीत, तर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल. हिंसक गोष्टी करणार्यांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.