लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात विहिंप उत्तरप्रदेशात ५ लाख हिंदूंचे करणार संघटन !

पुन्हा राबवणार घरवापसी अभियान !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – विश्‍व हिंदु परिषदेकडून धर्मांतरावर आळा घालण्यासाठी घराघरांत जाऊन जागृती केली जाणार आहे. ‘काशी प्रांतातील सर्व १९ जिल्ह्यांत ५ लाख लोकांचे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात संघटन केले जाईल. ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हे अभियान राबवले जाईल’, अशी माहिती विहिंपचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी दिली. ‘२३ आणि २४ जुलै या २ दिवसीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला’, असेही ते म्हणाले.

राय पुढे म्हणाले की, जे लोक हिंदु धर्म सोडून गेले आहेत, त्यांना संपर्क करून त्यांच्यात हिंदु धर्माविषयी श्रद्धा निर्माण केली जाईल. त्या माध्यमातून त्यांना ‘घरवापसी’ (धर्मांतरित हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश.) करण्यासाठी प्रेरित केले जाईल. विहिंपला लवकरच ६० वर्षे पूर्ण होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.