राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची गरळओक !
मुंबई – बाबासाहेब पुरंदरे यांचे विकृत लिखाण हे शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यासाठी होते. यामध्ये कुणाच्याही मनात दुमत असता कामा नये, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘वर्ष १९६९-७० मध्ये डोंबिवली येथील स.वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणात शिवव्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज ‘गुडगी’ रोगाने वारल्याचे म्हटले. याचा कुठलाही पुरावा किंवा ऐतिहासिक दाखला नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रभर हेच बोलले जात आहे. त्याचे जन्मदाते बाबासाहेब पुरंदरे आहेत. त्या वेळी पुरंदरे यांच्याविषयी कोण बोलणार ? काय बोलणार ? जोपर्यंत विरुद्ध बाजूला म्हणजे बहुजनांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक बखरींचा अभ्यासच झाला नव्हता, तोपर्यंत ‘कादंबरीकार ब.मो. पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे) हेच इतिहासतज्ञ आहेत’, असे संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होते. त्यात बहुजनांसह सगळेच होते. जेम्स लेन याच्या प्रकरणानंतर बहुजनांनी यात डोके घातल्यानंतर हा प्रकार बाहेर आला.’’
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ज्या पक्षाने अफझलखान वधाचे चित्र हटवण्यास भाग पाडून खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी बोलणे हास्यास्पद होय. मतभिन्नता असू शकते; परंतु सोयीनुसार जातीचे राजकारण करण्यासाठीच बाबासाहेब पुरंदरे यांची वारंवार अपकीर्ती केली जात आहे ! |