सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा चौकशी

नॅशनल हेराल्ड गैरव्यवहाराचे प्रकरण

काँग्रेस कार्यकर्त्यांची देशभरात निदर्शने

नवी देहली – नॅशनल हेराल्ड गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची २६ जुलै या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) दुसर्‍यांदा चौकशी करण्यात आली. २१ जुलैला ईडीकडून त्यांची २ घंट्यांंपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत ईडीने जवळपास २८ प्रश्‍न विचारल्याचे सांगण्यात येत आहे. सोनिया गांधी यांच्या दुसर्‍यांदा झालेल्या चौकशीच्या विरोधातही काँग्रेसकडून देशभर निदर्शने करण्यात आली. जूनमध्ये ईडीकडून राहुल गांधी यांची जवळपास ५० घंटे चौकशी करण्यात आली होती. त्या वेळीही जवळपास ५ दिवस काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशभरात निदर्शने करण्यात आली होती.

आंदोलनासाठी बसलेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी कह्यात घेतले !

देहलीच्या विजय चौक परिसरात झालेल्या आंदोलनात राहुल गांधी हेही सहभागी झाले होते. राहुल गांधी याठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. त्यामुळे पोलिसांनी राहुल गांधी यांना कह्यात घेतले.

काय आहे प्रकरण ?

‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या आस्थापनाच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र वर्ष २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ आस्थापनाने वर्ष २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला होता. ‘यंग इंडिया’ आस्थापनाचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर आहेत. डॉ. स्वामी यांनी वर्ष २०१३ मध्ये देहली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर या प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी चालू केली.

संपादकीय भूमिका

कायद्यानुसार चालू असलेल्या चौकशीला असा विरोध करणारी काँग्रेस कायदाद्रोही आणि जनताद्रोहीच होत ! ‘या प्रकणी दोषींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येऊ दे’,  असे काँग्रेसवाले कधी म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या ! असा दृष्टीकोन ते हिंदूंच्या प्रकरणांत मात्र न विसरता देतात !