देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. ऋतुराज गडकरी यांनी साधनेला प्रारंभ केल्यानंतर त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. ऋतुराज गडकरी

१. मिरज येथील आश्रमातील युवा साधना शिबिरात सहभागी होणे आणि त्या शिबिरातच देवाने भरभरून दिल्याने तिथेच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवणे

‘वर्ष २०१७ च्या दिवाळीमध्ये सनातन संस्थेच्या वतीने मिरज आश्रमात युवा साधना शिबिर झाले. त्यात पू. रमेश गडकरीकाकांनी (पू. आबांनी) मला जायला सांगितले; पण ‘माझा ओढा मायेकडे अधिक असल्याने त्या शिबिरात जायला नको’, असे मला वाटत होते. आई-बाबा आणि पू. आबा यांनी सांगणे अन् देवाचे नियोजन यांमुळे मी शिबिरात गेलो. लहानपणापासूनच माझ्यावर साधनेचे संस्कार होत असल्यामुळे मी आपोआपच त्या आश्रमातील वातावरणाशी एकरूप झालो. तीन दिवसांच्या त्या शिबिरात देवाने मला इतके भरभरून दिले की, मी तिथेच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवले.

२. रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे

काही वर्षांपूर्वी मी आई-बाबांच्या समवेत रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला होता. त्याच कालावधीत मला आध्यात्मिक त्रास होऊ लागले. तेव्हा पू. आबांनी मला सांगितले, ‘‘तुझे त्रास बाहेर आले आहेत. ही तुझ्यावर देवाची कृपा आहे.’’

३. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवू लागल्यावर ‘आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात ?’, हे देवाने लक्षात आणून देणे

शिबिर झाल्यानंतर मी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी गेलो. देवाने मला दिलेली ही मोठी संधी होती. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवू लागलो, तसे ‘आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि मला हे त्रास का होत आहेत ?’, हे देवाने लक्षात आणून दिले. साधनेत आल्यावर ‘माझा जन्म साधक कुटुंबात झाल्यामुळे देवाने माझ्या प्रारब्धातच ‘साधना करणे’ लिहिले आहे. त्यामुळे मी उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे जे माझे ध्येय होते, ते मायेतील असून त्याचा मला त्रासही होत होता’, हे माझ्या लक्षात आले.

४. लहानपणापासून असलेला दम्याचा त्रास हा शारीरिक नसून आध्यात्मिक असल्याचे लक्षात येणे

मला लहानपणापासून दम्याचा त्रास आहे. देवद आश्रमात आल्यावर काहीही कारण नसतांना मला दम्याचा तीव्र त्रास होऊ लागला. यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला नामजपादी उपाय सांगितले. जेव्हा मी नामजपाला बसायचो, तेवढाच वेळ माझा दम्याचा त्रास उणावत असे. नामजप थांबवला की, पुन्हा त्रास चालू होत असे. यावरून ‘हा शारीरिक त्रास नसून आध्यात्मिक त्रास आहे’, हे माझ्या लक्षात आले.

५. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला नको’, असा विचार येऊन मन नकारात्मक होणे आणि त्या वेळी देवानेच योग्य दृष्टीकोन देऊन त्या स्थितीतून बाहेर काढणे

‘माझ्यात असलेले तीव्र स्वभावदोष आणि अहं यांमुळेच मला अनिष्ट शक्तींचा त्रास होतो’, असे मला वाटते. तेव्हा पू. आबांनी मला तळमळीने आणि सातत्याने स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवायला सांगितली. मला माझ्यातील स्वभावदोषांचा पुष्कळ ताण येत असे. ‘प्रक्रिया राबवायला नको आणि लिखाण करायला नको’, असे विचार मनात येऊन मला नकारात्मकता यायची. तेव्हा देवच मला योग्य दृष्टीकोन देऊन त्या स्थितीतून बाहेर काढायचा.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ‘प्रतिदिन सारणी लिखाण केल्यास स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता उणावते’, हे अनुभवता येणे

माझ्या सारणी लिखाणात लिहिलेले काही अयोग्य विचार आणि प्रतिक्रिया यांवर सूचना न घेतासुद्धा ते विचार काही दिवसांनी आपोआप नष्ट झाल्याचे मला जाणवले. तेव्हा ‘मी विशेष प्रयत्न न करतासुद्धा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रतिदिन सारणी लिखाण केले, तरी स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता उणावते’, हे मला अनुभवता आले. त्यामुळे मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमित अन् चिकाटीने पूर्ण करू लागलो. त्याच समवेत ‘सांगितलेले नामजपादी उपाय पूर्ण करणे, सांगितलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण करणे, आध्यात्मिक त्रास होत असतांना देवाला आळवणे आणि देव जे करायला सांगेल, ते चिकाटीने करणे’, असे प्रयत्न देवाने करवून घेतले. देवाच्या कृपेने माझे बरेच मानसिक त्रास उणावले आहेत.

७. अनुभूती 

७ अ. ‘श्री वाघेश्वरीदेव्यै नमः ।’ या नामजपाने त्वचेचा त्रास न्यून होणे : मला देवद आश्रमात त्वचेचे काही त्रास झाले. त्यासाठी मी बाहेरच्या वैद्यांकडून बरीच औषधे घेतली. त्यात माझे बरेच पैसेही गेले; पण त्रास उणावत नव्हता. मी पू. आबांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला ‘श्री वाघेश्वरीदेव्यै नमः ।’ (ही त्वचेची देवता आहे.) हा नामजप करायला सांगितला. तेव्हा २ दिवसांतच त्रासाची तीव्रता उणावत असल्याचे माझ्या लक्षात आले.

७ आ. आध्यात्मिक त्रास झाल्यावर सद्गुरु राजेंद्रदादांना लघुसंदेश पाठवल्यावर आध्यात्मिक त्रास ५० टक्क्यांनी उणावत असल्याचे जाणवणे : काही वेळा मला होणार्‍या त्रासासाठी मी सद्गुरु राजेंद्रदादांना (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना) किंवा पू. आबांना उपाय विचारतो. त्रास होत असतांना मी सद्गुरु राजेंद्रदादांना लघुसंदेश पाठवल्यावर मला होणारा आध्यात्मिक त्रास ५० टक्क्यांनी उणावत असल्याचे मला जाणवते. यावरून ‘या नामजपादी उपायांमागे परात्पर गुरु कडॉ. आठवले यांची संकल्पशक्ती कशी कार्यरत आहे ?’, याची अनुभूती येते.

७ इ. डाव्या हाताच्या तळव्यावर कुरूप झाले असतांना देवाने संतसेवेच्या माध्यमातून त्वचेचा त्रास न्यून करणे : माझ्या डाव्या हाताच्या तळव्यावर कुरूप झाले होते. काही दिवसांपूर्वी मला पू. देशपांडेआजोबांची पाठ आणि पाय यांना तेल लावायची सेवा मिळाली. २ – ३ दिवसांनी सहज माझे माझ्या डाव्या तळहाताकडे लक्ष गेले. तेव्हा तळव्याची दगडासारखी झालेली त्वचा मऊ झाल्याचे आणि त्यामुळे होणारा त्राससुद्धा उणावल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘देवाने संतसेवेच्या माध्यमातून माझा त्वचेचा त्रास न्यून केला’, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

७ ई. आध्यात्मिक त्रास असल्यामुळे आरंभी संतांचे चैतन्यदायी कपडे धुतांना माझा पुष्कळ संघर्ष होणे आणि संतसेवा भावपूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यावर त्रासाचे प्रमाण उणावून संतांचे कपडे धुतांना त्यातून सुगंध येणे : माझ्याकडे संतांचे कपडे धुण्याची सेवा होती. मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे आरंभी संतांचे चैतन्यदायी कपडे धुतांना माझा पुष्कळ संघर्ष होत होता. कपड्यांतील चैतन्य आणि शक्ती मला सहन होत नव्हती. तेव्हा ‘माझा त्रास दूर व्हावा’, यासाठी ‘मला देवानेच संत सेवेची संधी दिली आहे’, याची मला सतत जाणीव होत होती. संतांचे कपडे धुतांना नामजप करत भावपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न देवानेच माझ्याकडून करवून घेतला. काही मासांनी माझा आध्यात्मिक त्रास अल्प झाला. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादांचे कपडे धुतांना मला त्यातून सुगंध यायला लागला.

७ उ. प्रत्येक पायरी नामजप आणि गुरुस्मरण करत चढल्याने दम्याच्या त्रासाची जाणीवही न होणे : देवद आश्रमात माझी निवासव्यवस्था तिसर्‍या मजल्यावर आहे. मला दम्यामुळे ३ मजले चढून जाणे पुष्कळ कठीण जायचे; पण प्रत्येक पायरी मी नामजप आणि गुरुस्मरण करत चढायचो. त्यामुळे मी कधी ३ मजले चढून वर आलो, हे कळायचे नाही आणि त्रासाची जाणीवही व्हायची नाही.

७ ऊ. सद्गुरु राजेंद्रदादांच्या खोलीत सेवेसाठी गेल्यावर मन निर्विचार होणे : जेव्हा मी सद्गुरु राजेंद्रदादांचे कपडे वाळत घालायला त्यांच्या खोलीत जात असे, तेव्हा माझे मन आपोआप निर्विचार होत असे. एरव्हीही मी जेव्हा त्यांच्या खोलीत जातो, तेव्हा मला त्यांच्या खोलीत एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते.

७ ए. नामजप चालू होणे : देवाच्या कृपेने देवद आश्रमातील साधकांना सद्गुरु राजेंद्रदादांचा सतत सत्संग मिळत आहे. मलाही त्यांचा अल्पाहार आणि महाप्रसाद यांच्या वेळी सत्संग मिळतो. ‘जेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा माझ्या जवळ येतात, तेव्हा माझा प्रत्येक श्वास एकदम खोलवर जात आहे’, असे जाणवून माझा नामजप आपोआप चालू होतो.’

– श्री. ऋतुराज गडकरी (वय २४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (डिसेंबर २०२०)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक