जिहादी मानसिकतेच्या विरोधात जळगाव येथे भव्य मोर्चा !

जळगाव, २५ जुलै (वार्ता.) – जिहादी मानसिकतेच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जळगाव शहरात २४ जुलै या दिवशी भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. तेथे मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी जिल्हाधिकार्‍यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सहमंत्री डॉ. योगेश गर्गे मोर्च्याला संबोधित करतांना म्हणाले की, उदयपूर येथील कन्हैयालाल, अमरावती येथील उमेश कोल्हे, राजस्थान येथील महिला पोलीस यांची हत्या या सर्व जिहादी मानसिकतेतून घडलेल्या घटना आहेत. याविषयी हिंदु समाजात जागृती होणे आवश्यक असून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत; म्हणून हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. मोहन तिवारी यांनी आभारप्रदर्शन केले. मोर्च्याला भाजपचे आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे यांच्यासह बजरंग दलाचे देवगिरी प्रांत प्रमुख श्री. ललित चौधरी, श्री. मोहन तिवारी, देवेंद्र भावसार, तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदु राष्ट्र सेना, हिंदु महासभा, अखिल भारतीय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे २ सहस्रांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.