उदयपूर (राजस्थान) येथे कन्हैयालाल यांचे दुकान असलेल्या बाजारात अद्यापही भीतीचे वातावरण !

१५ पैकी १३ दुकाने अद्यापही बंद !

कन्हैयालाल आणि बाजारपेठेतील बंद दुकाने

उदयपूर (राजस्थान) – येथील मलादास स्ट्रीट वरील बाजारामध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. याच बाजारात कन्हैयालाल यांचे दुकान होते. याच दुकानात रियाज अत्तारी आणि महंमद गौस यांनी २८ जून या दिवशी कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करून त्यांची हत्या केली होती. या घटनेनंतर हिंदूंमध्ये अद्यापही येथील दुकाने उघडण्याचे धाडस नसल्याचे दिसून येत आहे. ज्या भूतमहल गल्लीत कन्हैयालाल यांचे दुकान होते, त्या गल्लीत एकूण १५ दुकाने आहेत; मात्र त्या घटनेपासून यांतील १३ दुकाने अद्यापही उघडण्यात आलेली नाहीत. यावरून ‘हिंदूंमध्ये किती दहशत निर्माण झाली आहे’, हे लक्षात येते. विशेष म्हणजे दुकानदारांमध्येच नाही, तर हिंदूंमध्येही भीती असल्याने तेही या गल्लीत खरेदीसाठी येण्याचे धाडस करत नसल्याचे दिसून येत आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर येथील अनेक दुकानदारांना धमकीचे दूरभाष आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलतांना महंमद पैगंबर यांच्या कथित अवमान करणारे विधान केल्यावरून शर्मा यांची हत्या करण्याचे आवाहन धर्मांधांकडून सातत्याने करण्यात येत आहे. अशात कन्हैयालाल यांनी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांनी या प्रकरणी क्षमा मागितली होती, तसेच त्यांना अटकही करण्यात आली होती, तरीही त्यांची हत्या करण्यात आली.

१. कन्हैयालाल यांच्या दुकानाच्या शेजारी महावीर सेठ यांचे ‘लेटेस्ट टेलर्स’ नावाचे दुकान आहे. ते म्हणाले की, कन्हैयालाल यांच्या हत्येला २०हून अधिक दिवस उलटून गेले आहेत, तरीही लोक अद्याप घाबरलेले आहेत. माझ्या दुकानात दोन जण काम करतात. त्यातील एक आजारी आहे, तर दुसरा या घटनेमुळे घाबरलेला आहे. तो कामावर येऊ इच्छित नाही. आमच्या दुकानाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने लोकांमध्ये भीती आहे.

२. येथील सोन्याचे व्यापारी मयंक लोढा यांनी सांगितले की, आमच्याकडे येण्यापूर्वी ग्राहक दूरभाष करून बाजारातील स्थितीविषयीची माहिती घेतात. जर स्थिती सामान्य असेल, तरच ते दुकानात येण्याचा निर्णय घेतात.

३. येथील पोलीस अधीक्षक विकास शर्मा यांचे म्हणणे आहे की, आता बाजारात सामान्य वातावरण आहे. (जर बाजार सामान्य असता, तर नागरिकांनी तेथे वर्दळ चालू केली असती; मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती नाही, तर मग पोलीस असा दावा कसा काय करतात ? – संपादक) आम्ही व्यापारी आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी प्रतिदिन संपर्कात आहोत. गेल्या काही दिवसांत ३ वेगवेगळ्या धमक्या मिळाल्यानंतर चौकशी करण्यात येत आहे. बाजारातील कोणत्याही व्यापार्‍याला घाबरण्याची आवश्यकता नाही. (जनतेमध्ये पोलिसांविषयी विश्‍वास नसल्याने पोलिसांनी असे कितीही आवाहन केले, तरी जनतेला स्वतःच्या रक्षणाची निश्‍चिती होत नाही, तोपर्यंत जनता निर्धास्त होण्याची शक्यता अल्प आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदाच्या घटनेनंतरही हिंदूंमध्ये ‘पोलीस आणि सरकार आमचे रक्षण करील’, असा विश्‍वास निर्माण झालेला नाही, हेच यातून लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
  • हिंदू मूठभर जिहाद्यांना घाबरत असल्याचा हा परिणाम आहे ! याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन स्वतःचे संरक्षण केले पाहिजे !