सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी !

‘नॅशनल हेरॉल्ड’च्या कोट्यवधी रुपयांच्या अपव्यवहाराचे प्रकरण

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी

मुंबई – ‘नॅशनल हेरॉल्ड’च्या अपव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची २१ जुलै या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) कार्यालयात चौकशी झाली. या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशभर ‘सत्याग्रह’ या नावाखाली निदर्शने आणि आंदोलने करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रात्यारोपही करण्यात येत आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न ! – काँग्रेस

भाजपकडून काँग्रेसच्या नेत्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचसमवेत हा राजकीय सूडाचा भाग आहे, असे सांगत काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी ‘ईडी’चा निषेध केला.

काँग्रेसी निदर्शने हा ‘सत्याग्रह’ नसून ‘दुराग्रह’ ! – भाजप

दुसरीकडे काँग्रेसकडून चालू असलेली निदर्शने हा ‘सत्याग्रह’ नसून ‘दुराग्रह’ आहे. काँग्रेस पक्षाची सर्व संपत्ती ही गांधी घराण्याच्या खिशात गेली आहे, असा आरोप भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केला.

याआधीही या प्रकरणात काँग्रसचे नेते राहुल गांधी यांची ‘ईडी’ने चौकशी केली होती. त्या वेळीही काँग्रेसकडून निदर्शने आणि आंदोलने केली गेली होती.

काय आहे ‘नॅशनल हॅराल्ड’ प्रकरण ?

‘नॅशनल हॅराल्ड’ नावाचे दैनिक माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चालू केले होते. ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ नावाचे आस्थापन त्याचे प्रकाशक होते. वर्ष २००८ मध्ये दैनिकावर ९० कोटी रुपयांचे कर्ज झाल्याने ते बंद करण्यात आले. पुढे वर्ष २०१० मध्ये ‘यंग इंडिया लिमिटेड’ नावाचे आस्थापन स्थापन करण्यात आले. त्यामध्ये गांधी माता-पुत्राचे ७६ टक्के समभाग होते, तर उर्वरित २४ टक्के हे अन्य काँग्रेसी नेत्यांकडे होते. ‘यंग इंडिया लिमिटेड’ने केवळ ५० लाख रुपये देऊन ९० कोटी रुपये कर्ज असलेल्या ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ला विकत घेतले.